हिंगोली: नवरात्रोत्सवात छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी चिडीमार पथके : पोलीस अधीक्षक | पुढारी

हिंगोली: नवरात्रोत्सवात छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी चिडीमार पथके : पोलीस अधीक्षक

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा: हिंगोली जिल्हयात नवरात्रोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. महिला व मुलींचे छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील चिडीमार पथके स्थापन करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी आज (दि. 25) दिली.

पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हयातील ठाणेदारांची बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, किशोर कांबळे, सोनाजी आम्ले, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्यासह ठाणेदारांची उपस्थिती होती. यावेळी कलासागर यांनी जिल्हयातील पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला.

यावेळी कलासागर यांनी सांगितले की, नवरात्रोत्सवाच्या काळात सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत. दिवसा व रात्रीच्या वेळी गस्त सुरु ठेवली जाणार असून, प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत साध्या वेशातील चिडीमार पथके स्थापन करण्यात आली आहेत. या शिवाय संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजची दररोज तपासणी करून गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या सूचना सायबर सेल विभागाला दिल्या आहेत.

या शिवाय गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असून, ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक कलासागर केले.

असा असेल पोलीस बंदोबस्त

हिंगोली जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस अधीक्षक, सहायक पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह ३ उपाधीक्षक, ४४ पोलीस अधिकारी, ७२७ पोलीस कर्मचारी, १ राज्य राखीव दलाची तुकडी, ६०० गृहरक्षक दलाचे जवान असा बंदोबस्त असणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button