नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' (Man Ki Baat) कार्यक्रमात केली. सणासुदीच्या काळात प्लॅस्टिक बॅगा मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. मात्र, या बॅगामुळे होणारे नुकसान पाहता नागरीकांनी पर्यावरण पूरक 'गैर-प्लॅस्टिक' बॅगा वापराव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (Man Ki Baat)
पॉलिथिन हा एक नुकसानदायक कचरा आहे. नुकसानदायक गोष्ट ही आपल्या धार्मिक पर्वाविरोधात देखील आहे. प्लॅस्टिक बॅगांचा वापर लोकांनी करू नये, असे आवाहन मोदी (Man Ki Baat) यांनी केले. प्लॅस्टिक बॅगांचा वापर टाळून आपल्याबरोबर पर्यावरणाचे रक्षणसुध्दा करावे, असे सांगत मोदी पुढे म्हणाले की, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी योग आपल्याला उपयाेगी ठरताे, हे आता जगाने मान्य केलेले आहे. खासकरून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या आजारात योग परिणामकारक ठरते. योगाची ही शक्ती पाहून संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस पाळण्याची घोषणा केली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात 28 सप्टेंबर हा एक महत्त्वपूर्ण दिवस येत असून या दिवशी देशभरात शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने चंदीगड विमानतळाला भगतसिंग यांचे नाव दिले जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
देशात बऱ्याच वर्षांपासून 'साईन लँगवेज' साठी कोणतेही स्पष्ट हाव-भाव निश्चित नव्हते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वर्ष 2015 मध्ये इंडियन साईन लँगवेज रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेने आतापर्यंत 10 हजार शब्द आणि हाव-भावाचा शब्दकोश तयार केलेला आहे, अशी माहिती मोदी यांनी दिली.
देशात चित्ते आणण्यात आल्याचे लोकांनी जोरदार स्वागत केल्याचे सांगून मोदी म्हणाले की, देशात चित्ता प्राण्याला वाढविण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे. या अभियानाला सार्थक नाव देण्यासाठी तसेच चित्त्यांना वेगवेगळी नावे देण्यासाठी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना चित्ता पहायची संधी मिळेल. 'मायजीओव्ही' प्लॅटफॉर्मवर ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. चित्त्यांची नावे जर पारंपरिक राहिली तर ते जास्त चांगले ठरणार आहे.
हेही वाचलंत का ?