परभणी : १० गावांतील ५ हजार पशुधनाचे मोफत लसीकरण; पंकज आंबेगावकर यांचा पुढाकार | पुढारी

परभणी : १० गावांतील ५ हजार पशुधनाचे मोफत लसीकरण; पंकज आंबेगावकर यांचा पुढाकार

मानवत; पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांनी तालुक्यातील दहा गावांतील तब्बल पाच हजार पशुधनाला लम्पी स्कीन प्रतिबंधात्मक लसीचे स्वखर्चाने वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तालुक्यातील पिंपळा येथे आठ दिवसांपूर्वी दोन जनावरांना लम्पी स्कीन आजार आढळून आल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली होती. सदरील पशुधन गावातील अनेक जनावरांच्या संपर्कात आल्याने साथ पसरण्याची भीती निर्माण झाली होती. पशुसंवर्धन विभागाने या परिसरात तातडीने लसीकरण मोहीम राबवली. परंतु, शासकीय पातळीवर मर्यादित पुरवठा होत असल्याने लसीकरण वेगाने होत नव्हते.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांनी ही बाब लक्षात घेऊन स्वखर्चाने पाच हजार लसीच्या पुरवठा केला. यातून आंबेगाव, सावळी, सावरगाव, बोंदरवाडी, खडकवाडी, पिंपळा आदी गावात लसीकरण करण्यात आले. यामुळे लसीकरण वेगाने पूर्ण झाले. तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. दीपाली कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाने लसीकरण पूर्ण केले. सभापती आंबेगावकर यांनी नियमितपणे स्वतः लक्ष घालून लसीकरणाचा आढावा घेतला.

विशेष बाब म्हणजे, शासकीय यंत्रणेसोबत खासगी वैद्यकीय व्यावसायिकानी सामाजिक बांधिलकी जपत या मोहिमेत मोफत सहभाग नोंदविला. यामुळे केवळ पाच दिवसांत तब्बल पाच हजार पशुधनाला लसीकरण करणे शक्य झाले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button