नारायणगाव: सबनीस शाळेच्या आवारात भरदिवसा बिबट्याचे दर्शन, बिबट्याच्या भीतीने शाळेला दुपारनंतर सुटी | पुढारी

नारायणगाव: सबनीस शाळेच्या आवारात भरदिवसा बिबट्याचे दर्शन, बिबट्याच्या भीतीने शाळेला दुपारनंतर सुटी

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा: जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील वारुळवाडी शिवारात लागोपाठ दोन दिवस बिबट्याचे दर्शन होत असताना सोमवारी (दि. १९) सकाळी वारुळवाडी येथे बिबट्याला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी (दि. २०) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील रा. प. सबनीस शाळेच्या आवारामध्ये मुलींच्या वसतिगृहासमोर बिबट्या ठाण मांडून बसल्याचे आढळल्याने शालेय विद्यार्थी, तसेच नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. वनविभाग व रेस्क्यू टीम यांनी सापळा लावून बिबट्याला जेरबंद केले. हा बिबट्या साधारण एक वर्ष वयाचा असल्याचे वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी सांगितले.

वारुळवाडी येथील भर वस्तीत असणाऱ्या रा. प. सबनीस विद्यामंदिर या शाळेत सुमारे साडेपाच ते सहा हजार विद्यार्थी रोज शिक्षण घेत आहेत. या शाळेत अगदी हाकेच्या अंतरावर शाळेजवळ बिबट्या लिंबाच्या झाडाखाली ठाण मांडून बसल्याचे आढळून आला. शालेय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तत्काळ विद्यार्थ्यांना सोडून दिले व या घटनेची माहिती शाळा प्रशासनाने वनविभागाला कळवली. त्यानुसार उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अजित शिंदे, तसेच स्थानिक वनपाल, वनरक्षक व रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे चार तासांच्या अथक परिश्रमानंतर सायंकाळी ६ वाजता बिबट्याला रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी जाळीमध्ये जेरबंद केले. यासाठी वनक्षेत्रपाल अजित शिंदे, माणिकडोह येथील बिबट रेस्क्यू केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सनवे, महेंद्र ढोरे, वनपाल नितीन विधाटे, बिबट रेस्क्यू सदस्य किरण वाजगे, रूपेश जगताप, संकेत बोंबले व त्यांचे सहकारी, तसेच वनरक्षक नारायण राठोड, कल्याणी पोटवडे, स्वरूप रेगडे, संजय गायकवाड, अविनाश जाधव, बेले, पंढरी भालेकर, सलीम शेख, आकाश डोळस, वन कर्मचारी यांनी या विशेष परिश्रम घेतले.

Back to top button