पुणे : आयटीतील कर्मचार्‍याला सव्वा आठ लाखाचा गंडा | पुढारी

पुणे : आयटीतील कर्मचार्‍याला सव्वा आठ लाखाचा गंडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आयटी कंपनीत काम करणार्‍या एका व्यक्तीला सायबर चोरट्याने आठ लाख 24 हजार रुपयांचा गंडा घातला. बँकेतून लिंक पाठवल्याचे भासवून पॅनकार्ड अपडेट करण्याची बतावणी करत ही फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पोरवाल रोड लोहगाव येथील 44 वर्षीय व्यक्तीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास ऑनलाइन माध्यमातून घडली आहे.

फिर्यादी हे शहरातील एका आयटी कंपनीत काम करतात. त्यांच्या बँकेचे अ‍ॅप बंद होते. दरम्यान, सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे एक लिंक पाठवून ती बँकेची असल्याचे भासवले. दरम्यान, फिर्यादीला देखील ते खरे वाटले. त्यामध्ये पॅनकार्ड अपड़ेट करण्याबाबत सांगितले होते. फिर्यादी नेमके येथेच चोरट्याच्या जाळ्यात अडकले. सायबर चोरट्याने लिंकमध्ये सांगितल्याप्रमाणे फिर्यादींनी सर्व माहिती भरून मोबाईलवर आलेला गोपनीय क्रमांक भरला.

त्याचवेळी त्यांच्या बँक खात्यातून 8 लाख 24 हजार 998 रुपये काढून घेतले. खात्यातून पैसे कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. चौकशीअंती विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निगुडकर करीत आहेत.

हे लक्षात ठेवाच…
बँकेमार्फत अशी कोणत्याही प्रकारची लिंक पाठवली जात नाही, तसेच तुमच्या बँक खात्याचा गोपनीय क्रमांक व इतर माहिती मागितली जात नाही. त्यामुळे सायबर चोरट्यांकडून आलेल्या अशा कोणत्याही प्रकारची लिंक उघडून त्यामध्ये माहिती न भरण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Back to top button