तळेगाव परिसरात उन, ढग आणि पाऊस असे संमिश्र वातावरण | पुढारी

तळेगाव परिसरात उन, ढग आणि पाऊस असे संमिश्र वातावरण

तळेगाव: हवामान खात्याने पाऊस सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निरोप घेईल असा अंदाज वर्तविला होता. परंतु, तसे न झाल्यामुळे अनेक बळीराजांचे शेतीबाबतचे नियोजन विस्कळीत झाले आहे. तळेगाव परिसरात दिवसभरात कधी उन तर कधी ढग आणि पाऊस असे संमिश्र वातावरण आहे. उकाडाही असतो आणि सायंकाळपासून रात्री उशिरा पर्यंत पाऊस पडत असला तरी त्यामध्ये सातत्य नसते. या पावसामुळे भात, ऊसाचे फारसे नुकसान होत नाही, परंतु ज्या ठिकाणी सातत्याने पाऊस पडत आहे, तेथे ऊस पिवळा पडून नुकसान होण्याची शक्यता आहे. झेंडू, गुलछडी आदी फुलझाडांस हा पाऊस मारक ठरण्याची शक्यता आहे.

भातपीकावर करपा रोग थोडाफार पडत आहे. दिवसा कडक उन पडत असल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव फारसा जाणवत नाही. हा पाऊस भात पीकास पोषक असुन खाचरात पाणी साचत असल्यामुळे खत टाकणेसाठी योग्य वातावरण आहे. अनेक ठिकाणी भाताच्या ओंब्या निसावल्या आहेत तेथे या पावसाचा फायदा आहे. जर पाऊस उघडला नाही तर नुकत्याच लागलेल्या ओंब्यात पाणी जावून त्या पोकळ होवुन नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसाबरोबर वादळ, वारे आले तर मात्र भातपीक जमीनीवर पडून नुकसान होण्याची शक्यता आहे. डोंगरावर,माळरानावर,पठारावर भरपूर हिरवेगार गवत उगवल्यामुळे जनावरांस मुबलक चारा मिळत असुन जनावरांवर ज्यांची शेती आणि दुग्ध व्यावसाय अवलंबून आहे, त्यांना फायदेशीर झाले आहे.

Back to top button