बारामतीच्या जिरायती भागातील तलाव काठोकाठ; बाजरी व इतर पिकांचे नुकसान | पुढारी

बारामतीच्या जिरायती भागातील तलाव काठोकाठ; बाजरी व इतर पिकांचे नुकसान

लोणी भापकर : बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायती पट्ट्यात मागील आठवड्यात जोरदार पाऊस पडला. परिणामी, या परिसरात असणारे सर्व तलाव पूर्ण क्षमतेने (100 टक्के) भरले आहेत. या परिसरात असणारा वाकीचा पाझर तलाव, मोढवे येथील पुरंदरे पाझर तलाव, तरडोली परिसरातील खटकळीचा तलाव, लोणी भापकर येथील खासबाग, पळशी येथील गावठाण, इजगुडेमळा पाझर तलाव अशा अनेक गावांतील महत्त्वाच्या तलावांसह अनेक वर्षांपासून न भरलेले पाझर तलाव या आठवड्यात भरून वाहत आहेत. नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे सांडव्यातून वाहणार्‍या पाण्याने ओढ्यांना पूर आले आहेत.

या पाझर तलावांना बारामती तालुक्यातील अधिकारी, पदाधिकारी व गावातील गावनेत्यांनी भेट देऊन नुकतीच पाहणी केली आहे. हे पाझर तलाव भरले असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे बारामती तालुक्यातील पश्चिम जिरायती पट्ट्यातील या गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सध्यातरी सुटला आहे.

या भागातील शेती सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर कायम भेडसावत असतो. या पावसाने या वर्षीचा का होईना पाणी प्रश्न तात्पुरता सुटला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरीवर्ग आनंदित आहे. याचा फायदा ऊस उत्पादक शेतकर्‍यांना होणार असून, या पावसाने अनेक शेतकर्‍यांच्या बाजरी, मका, तरकारी व इतर चारापिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील नुकसान झालेले शेतकरी नुकसानभरपाईची मागणी करू लागले आहेत.

Back to top button