सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात पावसाचा जोर वाढला; जनजीवन विस्कळीत | पुढारी

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात पावसाचा जोर वाढला; जनजीवन विस्कळीत

कुडाळ: पुढारी वृत्तसेवा: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन तीन दिवस धुवाँधार पाऊस कोसळत आहे. कुडाळ तालुक्यात मध्यरात्री अचानक पावसाचा जोर वाढल्याने रविवारी (दि.११) सकाळी ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. सर्वच नद्यांना पूर आला असून सखल भागात पाणी साचले आहे. कुडाळ शहरातील डॉ. आंबेडकर नगरासह पावशी व अन्य भागातील घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे.

अनेक घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. शहरातील गुलमोहर हॉटेल समोरील रस्ता तसेच रेल्वे स्टेशन रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पावशी येथे घावनळेकडे जाणा-या रस्त्यावर पाणी आल्याने याठिकाणीही वाहतूक ठप्प झाली. काही वाहनधारकांनी पाण्यातूनच वाहने मार्गस्थ केली. माणगांव खोर्‍यातील निर्मला नदीला पूर आल्याने सकाळी आंबेरी पुलावर पाणी आल्याने तेथेही दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली.

कुडाळ भंगसाळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. लगतच्या शेतातही पाणी शिरल्याने भातशेती पाण्याखाली गेली आहे. अचानक पावसाचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button