Asia Cup 2022 : आशियाचा ‘क्रिकेट सम्राट’ कोण? | पुढारी

Asia Cup 2022 : आशियाचा ‘क्रिकेट सम्राट’ कोण?

दुबई ; वृत्तसंस्था : आशियाचा ‘क्रिकेट सम्राट’ कोण? याचे उत्तर आज मिळणार आहे. आशिया चषक (Asia Cup 2022) क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तान हे दोन संघ आमने-सामने येत आहेत. ही स्पर्धा जिंकून आर्थिक संकटाने होरपळलेल्या देशवासीयांना काही सुखाचे क्षण देण्याची संधी श्रीलंका संघाला आहे; परंतु त्यासाठी त्यांना पाकिस्तान संघाला सलग दुसर्‍यांदा हरवावे लागणार आहे.

या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडे आहे; परंतु तेथील परिस्थितीमुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरात येथे खेळवली जात आहे. दासुन शनाकाच्या नेतृत्वाखालील संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत असता तर हा त्यांच्यासाठी सुखद क्षण असता; परंतु सुपर-4 मधील श्रीलंकेची कामगिरी बघता बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाला ते मोठे आव्हान देऊ शकतात. सुपर-4 फेरीच्या शेवटच्या सामन्यात शुक्रवारी श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्ध सहज विजय मिळवला. याच सकारात्मक मानसिकतेतून ते अंतिम फेरीत खेळणार आहेत. त्यात त्यांना स्टेडियममध्ये श्रीलंकन प्रेक्षकांसोबतच भारत आणि अफगाणिस्तानचे चाहतेही पाठिंबा देणार आहेत.

वेगवान गोलंदाज दुष्मंता चमिरा याच्या अनुपस्थितीत श्रीलंकन गोलंदाजी मजबूत दिसते. महेश तिक्ष्णा आणि वानिंदू हसरंगा यांच्यामुळे फिरकी विभागही मजबूत आहे. त्यांच्याकडे फलंदाजीत कुसल मेंडिस आणि पथुम निसंकासारखे तगडे सलामीवीर, दानुष्का गुणतिलका, भानुका राजपक्षा आणि चामिका करुणारत्ने हे मधल्या फळीतील सक्षम खेळाडू आहेत. आशिया चषकात आतापर्यंत पाच सामन्यांत श्रीलंकन फलंदाजांनी 28 षटकार आणि 62 चौकार लगावले आहेत.

याच्याविरुद्ध पाकिस्तानी संघाला कर्णधार बाबर आझमच्या फॉर्मची चिंता आहे. त्याने या स्पर्धेतील पाच सामन्यांत फक्त 63 धावा केल्या आहेत. अंतिम फेरीत तो मोठी खेळी करण्यास उत्सुक असेल. गोलंदाजीत पाकिस्तान संघ सरस वाटतो. नसीम शाहची कामगिरी दिवसेंदिवस सुधारत आहे. हरिस रौफ, मोहम्मद हसनैन तसेच शादाब खान आणि मोहम्मद नवाझ प्रभावशाली ठरले आहेत.

नाणेफेक महत्त्वाची (Asia Cup 2022)

दुबईमध्ये नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरतो. या स्टेडियमवर धावांचा पाठलाग करणारा संघ विजयी ठरतो. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानी संघ येथे दोन वेळा हरला आहे.

Back to top button