Sourav Ganguly on Virat Kohli : गांगुलींचे विराट कोहलीवरून मोठे विधान, म्हणाले… | पुढारी

Sourav Ganguly on Virat Kohli : गांगुलींचे विराट कोहलीवरून मोठे विधान, म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sourav Ganguly-Virat Kohli : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीवरून केलेल्या वक्तव्यामुळे खूप चर्चेत आले आहेत. आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेपूर्वी गांगुलींनी कोहलीच्या फलंदाजीबद्दल वक्तव्य केले होते. आता या स्पर्धेतील भारताचा प्रवास संपुष्टात आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी 71 शतके फटकावणा-या किंग कोहलीवरून विधान केले आहे. विशेष म्हणजे स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच खुद्द गांगुलींनी विराटच्या फॉर्मबाबत अंदाज वर्तवला होता. त्याचबरोबर आता त्यांनी विराटचे जोरदार कौतुक केल्याचे समोर आले आहे.

सौरव गांगुलींनी एका मीडिया चॅनलशी बोलताना विराट कोहलीच्या ताज्या फॉर्मबद्दल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘खेळाडू म्हणून कौशल्याबद्दल बोलले पाहिजे. मला वाटते की यात विराट कोहली माझ्यापेक्षा अधिक कुशल आक्रमक फलंदाजी करतो. आम्ही वेगवेगळ्या पिढ्यांचे प्रतिनिधित्व केले. भरपूर क्रिकेट खेळलो. सुदैवाने मी माझ्या पिढीत तर तो त्याच्या पिढीत सरस ठरला आहे. पण विराट माझ्यापेक्षा जास्त सामने खेळेल. सध्या आकडेवारीचा विचार केल्यास मी त्याच्या पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. पण तो याबाबतीत नक्कीच मागे टाकेल. तो एक उत्तम खेळाडू आहे,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. (Sourav Ganguly on Virat Kohli)

दादाने केली होती भविष्यवाणी!

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराट कोहलीवर वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. आशिया चषक स्पर्धेपूर्वी गांगुलींनी एका मुलाखतीत कोहलीची स्तुती करताना विराटला मोठा खेळाडू म्हणून संबोधले होते. त्याचबरोबर आशिया चषक स्पर्धेदरम्यान पुन्हा फॉर्म मिळवण्यात तो यशस्वी ठरेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. गांगुली म्हणाले होते की, ‘विराटला सराव करू द्या आणि सामना खेळू द्या. तो मोठा खेळाडू आहे आणि मला आशा आहे की तो जोरदार पुनरागमन करेल. मला खात्री आहे की त्याला आशिया कपमध्ये नक्कीच त्याचा फॉर्म गवसेल.’ अखेर गांगुलींची ती भविष्यवाणी खरी ठरली. भलेही भारतीय संघ आशिया कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठू शकलेला नाही पण विराटने या स्पर्धेच्या 5 सामन्यात 92 च्या सरासरीने 276 धावा केल्या, ज्यात दोन अर्धशतके आणि एक शतकाचा समावेश आहे. (Sourav Ganguly on Virat Kohli)

83 डावांनंतर विराटचे शतक!

आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने सगळ्यांना दिलासा दिला. भारतीय संघ या स्पर्धेतून जरी बाहेर पडला असला तरी कोहली फॉर्ममध्ये परतल्याने क्रिकेट चाहत्यांसह संघ व्यवस्थापनाना दिलासा दिला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने 61 चेंडूत 122 धावांची नाबाद शतकी खेळी केली. त्याचे टी-20 कारकिर्दीतील हे पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक ठरले. याशिवाय 83 डावांच्या प्रतीक्षेनंतर त्याचे 71 वे आंतरराष्ट्रीय शतक पाहायला मिळाले. 23 नोव्हेंबर 2019 रोजी त्याने 70 वे शतक झळकावले होते. तेव्हापासून त्याने एकूण सर्व फॉर्मेटच्या 84 डावांमध्ये 2830 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 37.73 होती आणि या एका शतकासह त्याने 26 अर्धशतकेही झळकावली. (Sourav Ganguly on Virat Kohli)

Back to top button