PAK vs AFG : पाकिस्तान-अफगाणिस्तान सामन्यात ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची नोंद | पुढारी

PAK vs AFG : पाकिस्तान-अफगाणिस्तान सामन्यात ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : PAK vs AFG : आशिया कपच्या सुपर 4 फेरीत पाकिस्तानचा दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होता. पाकिस्तानने हा सामना एका विकेटने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना खूपच रोमांचक झाला, मात्र या सामन्यात दोन्ही संघांचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. पहिल्यांदा अफगाणिस्तानचा संघ अवघ्या 129 धावांवर गारद झाला, त्यानंतर पाकिस्तानने हे लक्ष्य गाठण्यासाठी नऊ विकेट गमावल्या.

दोन्ही संघांचे कर्णधार पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाले. याचबरोबर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. बाबर हा पाकिस्तानचा पहिला कर्णधार आहे, जो आशिया कपच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. चला तर अधिक माहिती जाणून घेऊया…

टी-20 मध्ये पाकचा दुसऱ्यांदा एका विकेटने विजय

पाकिस्तान संघाने अफगानिस्तान विरुद्धचा सामना चार चेंडू बाकी असताना एका विकेटने जिंकला. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानने एका विकेटने विजय मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानने 173 धावांचा पाठलाग करताना नऊ गड्यांच्या मोबदल्यात 174 धावा केल्या होत्या. (PAK vs AFG)

तर, अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तान संघाने तिसऱ्यांदा शेवटच्या षटकात सामना जिंकला. याआधी 2019 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकने दोन चेंडू राखून विजय मिळवला होता. तसेच 2018 च्या आशिया कपमध्येही पाकिस्तानने तीन चेंडू राखून सामना जिंकला होता. (PAK vs AFG)

आशिया कपमध्ये शून्यावर बाद होणारा बाबर पहिला पाकिस्तानी कर्णधार

130 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकला सुरुवातीलाच धक्का बसला. पाकच्या डावातील दुसऱ्याच चेंडूवर बाबर आझम बाद झाला. फजलहक फारुकीने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. यासह बाबरने लज्जास्पद विक्रम आपल्या नावावर केला. बाबर हा पाकिस्तानचा पहिला कर्णधार आहे, जो आशिया कपमध्ये पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. या स्पर्धेतील आतापर्यंतच्या चार सामन्यांत (10, 9, 14, 0) त्याने अत्यंत खराब फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. (PAK vs AFG)

T20 मध्ये दुसऱ्यांदा दोन्ही कर्णधार शून्यावर बाद

आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटच्या इतिहासात ही दुसरी वेळ होती, जेव्हा दोन्ही संघांचे कर्णधार पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाले. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. नसीम शाहने त्याला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला फारुकीने एलबीडब्ल्यू केले. या वर्षाच्या सुरुवातीला ग्रीस आणि स्वीडन यांच्यातील सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार पहिल्याच चेंडूवर एकही धाव न काढता बाद झाले होते. ग्रीसचा कर्णधार अनास्तासिओस मानोसिस आणि स्वीडनचा कर्णधार अभिजित व्यंकटेश यांना एकही धाव करता आली नव्हती. (PAK vs AFG)

Back to top button