ज्येष्ठ आणि दिव्यांगांना तीर्थक्षेत्र दर्शनासाठी नि:शुल्क ई-बस सेवा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा | पुढारी

ज्येष्ठ आणि दिव्यांगांना तीर्थक्षेत्र दर्शनासाठी नि:शुल्क ई-बस सेवा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पूर्व नागपुरात महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग पार्कला मंजुरी मिळाली असून, येत्या तीन महिन्यात पार्कच्या कामाला सुरुवात होणार आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना नागपूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता यावे यासाठी लवकरच निःशुल्क ई-बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन ई-बसेस नागपुरात आणणार असल्याची घोषणा केंद्रीय परिवहन व राज्य महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

यामध्ये एक डबलडेकर ई-बसचा समावेश असणार आहे. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारच्या दिव्यांग सहाय्यता योजना आणि राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरण करण्यात येत आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून साहित्य वितरणाचे शिबिर घेण्यात येत असून, या अंतर्गत नागपूरमधील लाभार्थ्यांकरिता सरदार वल्लभभाई पटेल मैदान, ए.व्ही.श्री. ले-आउट लकडगंज येथे शिबीर घेण्यात आले. यावेळी नितीन गडकरी बोलत होते.

गडकरी पुढे म्हणाले की, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ क्षेत्राचे दर्शन घेता यावे, याकरिता नागपूर-शेगाव अशी बस सेवा सुरू आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगांना नागपूर ते आदासा, नागपूर ते माहूर, नागपूर ते धापेवाडा अशा तीर्थ क्षेत्रांचे दर्शन घेता यावे, यासाठी डबलडेकर ई-बस सुरु करण्यात येणार आहे. तसेच लवकरच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तयार करण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. याशिवाय पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनीमध्ये सुरू होणाऱ्या विरंगुळा केंद्रांचेही लवकरच उद्घाटन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button