Ravindra Jadeja : रविंद्र जडेजा आशिया कपमधून बाहेर! टीम इंडियाला मोठा झटका | पुढारी

Ravindra Jadeja : रविंद्र जडेजा आशिया कपमधून बाहेर! टीम इंडियाला मोठा झटका

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कप 2022 मध्ये टीम इंदियाने पहिले दोन सामने जिंकून सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या ब्रिगेडचा पुढचा सामना पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील विजेत्याविरुद्ध आहे. हा सामना रविवारी 4 सप्टेंबर रोजी आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला आहे. जडेजाच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक जारी करून याला दुजोरा दिला आहे.

बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे की, “सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलची निवड केली आहे. रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलची यापूर्वी संघातील एक स्टँडबाय म्हणून निवड करण्यात आली होती आणि तो लवकरच दुबईत संघात सामील होणार आहे.

लयीत होता रवींद्र जडेजा

रवींद्र जडेजा चेंडू सोबतच फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चांगले प्रदर्शन करत होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने चौथ्या क्रमांकावर खेळताना 35 धावा केल्या होत्या. त्याची या खेळीने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवले होते. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण त्याने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात कमाल केली. त्याच्या थ्रोवर हाँगकाँगचा कर्णधार निझाकत खान धावबाद झाला. गोलंदाजीतही त्याने 4 षटकात केवळ 15 धावा दिल्या.

आशिया कपसाठी भारताचा संघ असा असेल :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

Back to top button