आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात भाजपमधीलच आमदारांनी तक्रारीचा सूर | पुढारी

आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात भाजपमधीलच आमदारांनी तक्रारीचा सूर

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्राबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात आता भाजपमधीलच आमदारांनी तक्रारीचा सूर आवळला आहे. विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे भाजप पुरस्कृत आमदार नागो गाणार यांनी प्रशांत बंब यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आणि पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचे वक्तव्य संपूर्ण शिक्षक समुदायाचे अपमान करणारे असून ते बेताल वक्तव्य करत आहेत. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाचे आमदार चुकीने वागणाऱ्या शिक्षकांना संरक्षण देत नाही. कोणावर आरोप करणे आणि आरोप सिद्ध होणे यामध्ये फरक आहे. त्यामुळे जोवर एखाद्या शिक्षकाविरोधात दोष सिद्ध होत नाही, तोवर त्याच्याविरोधात कारवाई कशी करावी असा प्रश्नही नागो गाणार यांनी विचारला आहे.

प्रशांत बंब विधान परिषदेच्या ज्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाची आता गरज नाही असे मत व्यक्त करत आहेत. त्याच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस (देवेंद्र फडणवीसांचे वडील) आणि भाजपचे मातब्बर नेते नितीन गडकरी यांनी केले आहे, हे बंब यांनी विसरू नये, याची आठवणही गाणार यांनी करून दिली. विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची गरज नाही, असे वक्तव्य करणे म्हणजे गंगाधरराव फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्यांचे योगदान नाकारल्यासारखे आहे, हे बंब यांनी लक्षात ठेवावे असे गाणार यावेळी बोलताना म्हणाले.

शिक्षक आमदार अभिजीत वंजारी यांनीही घेतला समाचार

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचा बंब लीक झालाय, त्याला गळती लागली आहे. त्यामुळे ते असे बेताल वक्त्व्य करत आहेत. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निर्मिती घटनेने केली आहे. प्रशांत बंब यांच्या वडिलांनी केलेली नाही, अशी टीका विधानपरिषदेच्या नागपूर विभागाचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार व काँग्रेस नेते अभिजीत वंजारी यांनी केली आहे. प्रशांत बंब यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे असून शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राच्या अवस्थेबद्दल सरकार आणि त्यांच्यासारखे आमदारच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी शिक्षकांवर आगपाखड करू नये, असा इशाराही अभिजीत वंजारी यांनी दिला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button