औरंगाबाद विभाग बारावी परीक्षेत राज्यांमध्ये अव्वल तर दहावी परीक्षेत तृतीय स्थानावर | पुढारी

औरंगाबाद विभाग बारावी परीक्षेत राज्यांमध्ये अव्वल तर दहावी परीक्षेत तृतीय स्थानावर

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.२) सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. या निकालात औरंगाबाद विभागाने बारावी परीक्षेत राज्यांमध्ये अव्वल तर दहावी परीक्षेत तृतीय स्थान पटकावले.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे लेखी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेत विभागातून २ हजार २१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ०६७ विद्यार्थ्यांनी २५ केंद्रांवर परीक्षा दिली. त्यातून ८२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले यात आठ विद्यार्थी विशेष श्रेणी, १८ विद्यार्थी प्रथम श्रेणी, ५२ विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर ७४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ३९.७६ टक्के इतकी आहे.

तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचे लेखी परीक्षा २७ जुलै ते २४ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. यात विभागातून २ हजार ५७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २१ केंद्रावर २ हजार ५३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून १ हजार २१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल ४८ टक्के लागला. निकालात औरंगाबाद विभाग राज्यात अव्वल स्थानी आला. विशेष श्रेणीत १९, प्रथम श्रेणीत ६६, द्वितीय श्रेणीत १४८ तर ९८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

गुणपडताळणी, छायांकितप्रत मिळविण्यासाठी यावर भेट द्या…

विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय शिक्षण मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. गुणपडताळणी ३ ते १२ सप्टेंबरपर्यंत तर छायाप्रतीसाठी ३ ते २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येईल. गुणपडताळणी अर्ज करण्यासाठी दहावीचे विद्यार्थी http://verification.mh-ssc.ac.in या तर बारावीचे विद्यार्थी http://verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर अर्ज करू शकतात.

हेही वाचलंत का? 

Back to top button