पिंपरी : महापालिका शिक्षण विभागाकडून 24 शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यामध्ये महापालिका शाळांतील 20 तर, खासगी शाळांतील 4 शिक्षकांचा समावेश आहे. तर, 6 आदर्श शाळांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात 5 तारखेला सकाळी 10 वाजता पुरस्कारांचे वितरण होणार आहे. दरम्यान, गौरी आवाहननिमित्त महापालिका शाळांना महापालिकेने शनिवारी (दि. 3) सुट्टी दिलेली आहे. 4 तारखेला रविवारची सुट्टी तर, 5 तारखेला शिक्षक दिनानिमित्त शाळांना सुट्टी असणार आहे.
त्यामुळे महापालिका शाळांतील शिक्षकदिन 6 तारखेला होणार आहे. खासगी शाळांमध्ये मात्र, 5 तारखेला शिक्षकदिनाची सुट्टी नसल्याने त्या शाळांमध्ये 5 तारखेलाच शिक्षक दिन साजरा होईल.
दोन विशेष पुरस्कृत शाळांचा समावेश
महापालिकेकडून देण्यात येणार्या 6 आदर्श शाळा पुरस्कारांमध्ये 2 विशेष पुरस्कृत शाळांचा समावेश आहे. त्याशिवाय, 4 बालवाडीताई पुरस्कार, आकुर्डी आणि पिंपरी उन्नत केंद्रातील प्रत्येकी 1 विषयतज्ज्ञ, 1 पर्यवेक्षक आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी 25 शिक्षकांचे अर्ज प्राप्त
गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी महापालिका शाळांतून 25 शिक्षकांचे अर्ज आले होते. खासगी अनुदानित प्राथमिक शाळांतून 9 तर, खासगी अनुदानित माध्यमिक शाळांतून 4 अर्ज आले होते. बालवाडीताईसाठी 13 तर, आदर्श शाळांसाठी 8 अर्ज आले होते, अशी माहिती पर्यवेक्षिका अनिता जोशी, पर्यवेक्षक सुनील लांघी, राजेंद्र कांगुडे यांनी दिली.