गडचिरोली जिल्ह्यातील ३ हत्ती अंबानीच्या प्राणी संग्रहालयासाठी गुजरातला रवाना | पुढारी

गडचिरोली जिल्ह्यातील ३ हत्ती अंबानीच्या प्राणी संग्रहालयासाठी गुजरातला रवाना

गडचिरोली; पुढारी वृत्‍तसेवा : जिल्‍ह्यातील नागरिकांच्या प्रखर विरोधानंतरही अहेरी तालुक्यातील पातानिल येथील वनविभागाच्या हत्ती कॅम्पमधील ३ पाळीव हत्ती आज (शुक्रवार) मध्यरात्री गुपचूप गुजरातमधील जामनगरला हलविण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गुजरातमधील जामनगरच्या भागात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून देशातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय सुरु करण्यात येत आहे. सुमारे २५० एकर जागेतील या प्राणीसंग्रहालयात देशभरातील विविध ठिकाणचे दुर्मीळ प्राणी नेण्याची प्रक्रिया या वर्षाच्या प्रारंभीच सुरु झाली आहे.

केंद्र सरकारच्या वने आणि पर्यावरणमंत्रालयाच्या अख्त्यारितील केंद्रीय प्राणी प्राधिकरणाने १२ फेब्रुवारी २०१९ ला रिलायंन्सच्या या प्राणीसंग्रहालयास मंजुरी दिली आहे. अहेरी तालुक्यातील कमलापूर आणि पातानिल येथील हत्तींना नेण्याच्या हालचाली जानेवारी २०२२ मध्ये सुरु झाल्या होत्या. प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून तसे पत्रही येथील वनविभागाला प्राप्त झाले होते. परंतु जिल्हाभरातून हत्तींच्या स्थलांतरणाला विरोध झाल्यानंतर हत्तींना तेथेच ठेवण्यात आले.

परंतू आता चार दिवसांपूर्वी वरिष्ठ स्तरावरून आलापल्ली वन विभागाला पातानील येथील हत्ती हलविण्याबाबत पत्र मिळाले. त्यानुसार आज मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास रिलायन्स समुहाच्या राधे क्रिष्णा एलिफंट वेल्फेअर ट्रस्टची तीन वाहने पातानिल येथे दाखल झाली. या वाहनांमधून ३ हत्तींना जामनगरच्या दिशेने रवाना केले. यामुळे नागरिक प्रचंड संतापले असून, समाजमाध्यमांवर हत्तींच्या स्थलांतरणास तीव्र विरोध केला जात आहे. आता कमलापूर हत्ती कॅम्पमधील उर्वरित ५ हत्ती देखील गुजरातच्या प्राणीसंग्रहालयात नेले जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या स्थलांतराविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे.

कमलापूरचे हत्ती कॅम्प पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे हत्ती पाहण्यासाठी दुरदुरुन पर्यटक येत असतात. परंतु महाराष्ट्रातील एकमेव हत्तीकॅम्प बंद पाडण्याच्या हालचाली होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा :  

Back to top button