जळगाव हळहळलं : दोन कारमध्ये लागलेली शर्यत बालकाच्या जीवावर बेतली, धडकेने 15 फूट फेकला गेला चिमुरडा | पुढारी

जळगाव हळहळलं : दोन कारमध्ये लागलेली शर्यत बालकाच्या जीवावर बेतली, धडकेने 15 फूट फेकला गेला चिमुरडा

जळगाव : दोन कारमध्ये लागलेली शर्यत एका ११ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने सायकलवरुन जाणाऱ्या मुलास जोरदार धडक दिली असता, विक्रांत संतोष मिश्रा (वय ११) हा जागीच ठार झाला आहे. या कारची धडक इतकी भीषण होती की सायकलस्वार मुलगा १५ फूट वर फेकला जाऊन खाली पडला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरात ही घटना घडल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी कार चालक मुलांसह कार मालकाला ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरातील रहिवासी विक्रांत मिश्रा हा चुलत भाऊ सुनील जितेंद्र मिश्रा याच्यासोबत सायकलीने मेहरुण तलावाकडे फिरायला गेला होता. त्याचवेळी मास्टर कॉलनीतील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा कार घेऊन शिकण्यासाठी मेहरुण तलावाकाठी गेला होता. त्याच्या मित्राचीही कार या ठिकाणी होती. दोन्ही मुलांनी कारची शर्यत लावली. त्यात (क्र.एम.एच १९ बी.यू ६००६) या कारने रस्त्याच्याकडेला असलेल्या विक्रांतला जोरदार धडक दिली. त्यात विक्रांत चेंडूसारखा १५ फुट वर फेकला जाऊन खाली पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला. या अपघातात विक्रांतचा जागीच मृत्यू झाला.

गाडी मालकावर गुन्हा दाखल
या घटनेनंतर कारमधील मुलांनी अपघातग्रस्त विक्रांतला उचलून रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तो मृत्यू झाला होता. या घटनेत मिश्रा परिवारातील एकुलता एक असलेला ११ वर्षीय विक्रांत मिश्रा यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. हे तिन्ही तरुण अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहेत. पोलीस त्यांची पडताळणी करुन त्यांच्यासह गाडी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रांत हा मेहरुण जलतरण तलावसमोरील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता. विक्रांत हा मिश्रा परिवारातील एकुलता एक मुलगा आहे. त्याचे वडील संतोष मिश्रा हे जळगाव साऊंड असोसिएशन संघटनेचे सहसचिव म्हणून काम करतात.

हेही वाचा :

Back to top button