शिरगाव : पुढारी वृत्तसेवा : आजच्या इंटरनेटच्या युगात पत्राची लोकप्रियता कमी झाली जरी असली तरी आजही पत्राचा वापर होतो आहे आणि तक्रारपर पत्राची दखलही घेतली जात आहे. सोमाटणे ग्रामपंचायतीने निनावी पत्राची दखल घेत सोमाटणे-शिरगाव रस्त्यावरील खड्डे बुजवून डागडुजी केली. सोमाटणे ग्रामपंचायतीला आलेल्या एका निनावी पत्राची तत्काळ दखल घेवून सोमाटणे- शिरगाव रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवले. सोमाटणेच्या माजी सरपंच मंगल मुर्हे यांना काही दिवसांपूर्वी सोमाटेण-शिरगाव रस्त्याच्या दुरवस्थाबाबत एक निनावी पत्र आले होते. या पत्राद्वारेे सदर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी केली होती.
हे पत्र मुर्हे यांनी उपसरपंच राकेश मुर्हे यांना पाठवले. राकेश मुर्हे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी या पत्राची तात्काळ दखल घेत सोमाटणे- शिरगाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेत रस्त्याची डागडुजी केली. याविषयी उपसरपंच राकेश मुर्हे म्हणाले की, पत्राद्वारे आलेल्या तक्रारीची आम्ही तातडीने दखल घेत संबंधित समस्येचे निराकरण केले. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्यांचा त्रास आता नाहीसा होणार आहे.