IND vs PAK : पाकिस्तानला नमवत रोहित शर्मा करणार विराट कोहलीची बरोबरी | पुढारी

IND vs PAK : पाकिस्तानला नमवत रोहित शर्मा करणार विराट कोहलीची बरोबरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कप २०२२ च्या टी २० सामन्यांचा थरार सुरु झाला आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दुसर्‍यांदा जेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदविण्याच्या निर्धाराने मैदानात आज, (दि.२८ ऑगस्ट) उतरेल. भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. रोहितला आपल्या कॅप्टन्सीमध्ये हा सामना जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे.

भारतीय संघासाठी कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावे सर्वाधिक टी २० सामने जिंकण्याच्या विक्रम आहे. विराटने ५० सामन्यात नेतृत्व केले होते. त्यापैकी ३० सामन्यामध्ये विराटने प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केले होते. आता रोहितला पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकून विराटच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.

रोहितचे टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून शानदार रेकॉर्ड (IND vs PAK)

नोव्हेंबर २०२१ नंतर रोहित शर्मा जरी पूर्णवेळ कर्णधार झाला असला तरी त्याआधीही त्याने हंगामी कर्णधारपद भूषवले आहे. तत्कालीन कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे ज्या सामन्यात खेळू शकत नव्हता तेव्हा टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी रोहितच्या खांद्यावर दिली जायची. रोहित शर्माने आतापर्यंत ३५ टी २० सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यापैकी २९ टी २० सामन्यात रोहितने टीम इंडियाला विजयी केले आहे. पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यात जर टीम इंडियाने विजय मिळवला, तर रोहित शर्मा हा कर्णधार म्हणून ३० वा टी २० विजय ठरेल आणि विराटच्या विक्रमाची बरोबरीही होईल.

Rohit Sharma vs Virat Kohli

आता रोहित पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकून विराटच्या विक्रमाची बरोबरी करणार का ? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागणार आहे. रोहित शर्माचे हे आकडे तो एक यशस्वी कर्णधार आहे हे सांगण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेतील सामन्यापूर्वीच पाकिस्तान संघाला घाम फुटल्याची चर्चा आहे. टीम इंडिया पुन्हा एकदा आशियाचा बादशाह बनून सलग तिसऱ्यांदा आशिया चषक ट्रॉफी उंचावणार असा विश्वासही क्रिकेट तज्ज्ञांसह चाहत्यांना आहे. यापूर्वी २०१६ मध्ये एमएस धोनी आणि २०१८ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हे विजेतेपद पटकावले आहे.

विराट कोहलीच्या फॉर्मकडे सर्वांचे लक्ष (IND vs PAK)

आशिया चषकापूर्वी टीम इंडियामध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीच्या फॉर्मकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममधून जात आहे. मात्र, आशिया चषकात विराट कोहली आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे.

Back to top button