बेल्हे: खड्डेमय रस्त्यावरूनच होणार बाप्पाचे आगमन, ग्रा.पं.च्या दुर्लक्षामुळे गणेशभक्तांमध्ये नाराजी | पुढारी

बेल्हे: खड्डेमय रस्त्यावरूनच होणार बाप्पाचे आगमन, ग्रा.पं.च्या दुर्लक्षामुळे गणेशभक्तांमध्ये नाराजी

बेल्हे, पुढारी वृत्तसेवा: लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. मात्र, बेल्ह्यात ग्रामपंचायतीने अद्यापही जागोजागी पडलेले खड्डे भरले नसल्याने गणेशभक्तांना बाप्पाचे स्वागत खड्डेमय रस्त्यावरूनच करावे लागणार आहे. बुद्धिदेवता गणेशाच्या आगमनाची तयारी सर्वत्र जोरदार सुरू झाली आहे. परिसरात पावसाने काही प्रमाणात उसंत घेतल्याने खरेदीनेही वेग घेतला आहे. मात्र, बेल्हे गावात बाप्पाच्या आगमनाची वेळ आली, तरीही खड्ड्यांची स्थिती ‘जैसे थे’च आहे. रस्त्यांवर केवळ खड्डेच नसून रस्त्यांना उंच सखलपणा आल्याने गणेशभक्तांची मूर्ती नेताना त्रेधातिरपीट उडणार आहे. बेल्हे गावातील चांदणी चौक, श्रीराम चौक, बेल्हेश्वर चौक, पोळेश्वर चौकात रस्त्याच्या सुरुवातीस खड्डे कायम आहेत. रोहिदास मंदिर, अळकुटी रस्त्यावर खड्डे कायम आहेत. विशेष म्हणजे, या रस्त्यावरून गावातील सर्वच गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका जातात. या रस्त्यांवरील खड्ड्यांचे शुक्लकाष्ट अद्यापही कायम आहे. गावात काही ठिकाणी रस्ता नसून केवळ खड्डेच खड्डे या रस्त्यावर आहेत. त्यामुळे किमान गणरायाच्या आगमनासाठी तरी ग्रामपंचायत प्रशासनाने खड्डे भरून घेण्याची गरज असल्याचे मत सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, सरपंच गोट्याभाऊ वाघ यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून पावसाळ्यात बेल्हे-आळकुटी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांत मुरूम टाकून मलमपट्टी केली होती. परिणामी, खड्ड्यांची खोली कमी झाली असली, तरी खड्डेमय प्रवास ‘जैसे थे’च आहे. गावात रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे स्पीडब—ेकर बनले आहेत. परिणामी, जागोजागी अपघातही होत असतात. मात्र, गणेशोत्सवानिमित्त या समस्यांमधून गणेशभक्तांची सुटका करण्यात यावी, अशीच मागणी केली जात आहे.

Back to top button