‘5G’ सेवा 12 ऑक्टोबरपासून सुरू होणार : आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती | पुढारी

‘5G’ सेवा 12 ऑक्टोबरपासून सुरू होणार : आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : येत्या 12 ऑक्टोबरपासून देशात 5 जी दूरसंचार सेवेची सुरुवात होईल, असा विश्वास केंद्रीय दळणवळण आणि आयटी खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. 5 जी सेवा लवकरात लवकर सुरु करता यावी, यासाठी व्यापक प्रयत्न केले जात असून टप्प्या-टप्प्याने देशभरात या सेवेचा विस्तार केला जाणार असल्याचे वैष्णव यांनी नमूद केले. (5G services)

पुढील दोन ते तीन वर्षांत देशाच्या काना-कोपऱ्यात 5 जी सेवा पोहोचलेली असेल, असे सांगून वैष्णव पुढे म्हणाले की, सर्वांना परवडेल अशा माफक दरात ही सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागावर लक्ष देण्यास दूरसंचार कंपन्यांना सांगण्यात आले आहे. 5 जी स्पेक्ट्रम सेवा देण्यासाठी अलिकडेच दूरसंचार कंपन्यांना सरकारकडून स्पेक्ट्रमचे वाटप करण्यात आले होते. ज्या दिवशी निविदादार कंपन्यांनी निविदा जिंकली होती, त्याच दिवशी संबंधित कंपन्यांना स्पेक्ट्रम वाटपाचे पत्र देण्यात आले होते. (5G services)

स्पेक्ट्रम लिलावाद्वारे सरकारला सुमारे दीड लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. ज्या कंपन्यांना 5 जी स्पेक्ट्रम दिला जाणार आहे, त्यात भारती एअरटेल, रिलायन्स जिओ, अडानी डेटा नेटवर्क, वोडाफोन आयडिया यांचा समावेश आहे. यातील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने निम्मा स्पेक्ट्रम प्राप्त केला आहे. यासाठी जिओ कंपनीला 87 हजार 947 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. (5G services)

Back to top button