नाशिक : सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमणे हटविण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश | पुढारी

नाशिक : सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमणे हटविण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका तसेच इतरही सरकारी जागा तसेच सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमणांचे प्रमाण वाढत असल्याने अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यात गणेशोत्सव आणि इतरही उत्सव, सणांचे दिवस सुरू झाल्याने होणारी वाहतूक कोंडी आणि इतर अनुचित प्रकार पाहता मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी तातडीने अतिक्रमणे हटविण्याचे आदेश अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांसह विभागीय अधिकार्‍यांना दिले आहेत.

महापालिकेतील अतिक्रमण विभागाला सक्षम अधिकारी नसल्याने त्याचा परिणाम अतिक्रमण हटविण्याच्या कार्यवाहीवर होत आहे. शहरासह परिसरात आजमितीस मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे. दुकानदारांकडून तर दुकानाच्या पाट्या थेट फुटपाथवर लावल्या जात असून, हॉकर्सधारकही मोठ्या प्रमाणावर रस्ता व्यापत असल्याने वाहतूक कोंडीसारख्या प्रकारांना सामोरे जावे लागत आहे. अतिक्रमण विभागाबाबत अनेक तक्रारी आहेत. परंतु, त्याची दखल या विभागातील वरिष्ठांकडून घेतली जात नसल्याने या विभागातील कर्मचार्‍यांचे फावत आहे. मनपाचे नूतन आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी शहरात दौरा केला असता त्यांना अनेक ठिकाणी अतिक्रमणे आढळून आली.

अनेक ठिकाणी सायकल ट्रॅक निर्माण केले आहेत. त्र्यंबक नाका ते जलतरण तलाव हा रस्ता दोन्ही बाजूने मॉडेल रोड बनविण्यात आला असून, सायकल ट्रॅकही सुशोभित करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्यावर तसेच इतरही फुटपाथवर अतिक्रमणे आणि वाहन पार्किंग केले जात असल्याचे दिसून येते.

पथक जाण्यापूर्वीच सूचना
अतिक्रमण हटाव पथक अतिक्रमण असलेल्या स्थळी येणार असल्याची सूचना संबंधित दुकानदार, विक्रेत्यांना जाते. त्यामुळे पथकाचे वाहन पोहोचण्यापूर्वीच संबंधित ठिकाणी सर्व काही सामसूम झालेले दिसते. पथकाचे वाहन पुढे गेल्यानंतर काही वेळेतच अतिक्रमण ‘जैसे थे’ होत असल्याने अतिक्रमण विभागाच्या कार्यवाहीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. त्याची प्रचिती सीबीएस येथे नेहमीच येते. अतिक्रमण विभागात अनेक वर्षांपासून कर्मचार्‍यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळेच त्यांचे अतिक्रमणधारकांशी संबंध निर्माण झालेले असल्याने त्यातूनच त्यांना टिप्स दिल्या जातात.

हेही वाचा :

Back to top button