संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : मुलीसोबत लग्नास नकार दिल्याने परप्रांतीय धर्मगुरूने दोघा साथीदारांसह मुलीच्या पित्याचा गळा दाबून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी धर्मगुरूसह त्याच्या साथीदाराला अटक केली. मात्र, यातील एक आरोपी पसार झाला आहे.
मोहम्मद जाहीद मोहम्मद युनुस मुलतानी (रा. साहरनपूर, उत्तर प्रदेश) या धर्मगुरूसह मोहम्मद इम्रान निसार सिहकी (रा. कल्याण) याला अटक केली आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी हा धर्मगुरू वर्गणी मागण्यासाठी संगमनेर येथे आला होता. तो संगमनेरमधील जुनेद आहतेशाम अन्सारी यांच्या बेकरीमध्ये राहत होता. धार्मिकस्थळी तो धर्मगुरू म्हणून कार्यरत होता. दोन महिन्यांपूर्वी या धर्मगुरूने जुनेदचे वडील आहतेशाम इलियास अन्सारी यांच्याकडे त्यांच्या मुली सोबत लग्नाची मागणी घातली होती. मुलीच्या लग्नाबद्दल तो नेहमी विचारणा करत होता. मात्र मुलीच्या वडिलांनी त्याला स्पष्ट नकार दिला होता.
3 एप्रिल रोजी मुलीचे वडील आहतेशाम हे दुचाकीवरून घराबाहेर पडले. ते परत आलेच नाही, तसेच त्यांचा मोबाईलही बंद लागत होता. सर्वत्र शोधूनही वडील न सापडल्याने जुनेद अन्सारीने 4 एप्रिलला संगमनेर शहर पोलिसांत तक्रार दिली.
हा धर्मगुरू काही काळ कल्याणलाही राहत होता. जुनेदचे वडील आहतेशाम हे अधूनमधून कल्याणला त्या धर्मगुरूकडे जात असल्याने तशी चौकशी केली, मात्र त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे जुनेद यांना संशय बळावला. तसे त्याने पोलिसांना कळविले. दरम्यान मालदाड जंगलात 24 एप्रिलला अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आल्याने जुनेद याने तिकडे धाव घेत बारकाईने पाहिले, त्यावेळी तो मृतदेह वडील आहतेशाम यांचाच असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांत अकस्मात मृत्युचा गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र धर्मगुरू जाहीद यानेच वडीलांचा घातपात केला असल्याचा संशय असल्याचे जुनेदने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी धर्मगुरूच्या शोधासाठी उत्तरप्रदेश गाठले. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. यासंदर्भात जुनेद आहतेशाम अन्सारी याने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
मुलीसोबत लग्न करण्याची धर्मगुरूची इच्छा होती, मात्र आहतेशाम त्याला नकार देत होते. त्याच रागातून मोहम्मद इम्रान निसार सिहकी (रा. कल्याण) आणि मोहम्मद फैजान शमीम अन्सारी (धामपूर, बिजनौर) यांच्या मदतीने त्याने खुनाचा कट रचला. मालदाड गावाच्या पुढे असलेल्या जंगलात 3 एप्रिलला दुपारी बाराच्या सुमारास दोरीने आहतेशाम यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह तेथेच सोडून पळ काढला. धर्मगुरू मुलतानी, सिहकी या दोघांना अटक केली असून, मोहम्मद अन्सार हा मात्र पसार झाला आहे.
हेही वाचा