भाजपला त्यांच्या शब्दाची आठवण करून द्या, मंत्री भुजबळांची अजित पवारांकडे मागणी

भाजपला त्यांच्या शब्दाची आठवण करून द्या, मंत्री भुजबळांची अजित पवारांकडे मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- भाजपने विधानसभेसाठी ८०-९० जागा देण्याचा शब्द दिला आहे. त्याची आठवण त्यांना करून द्या, अशी मागणी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. मुंबईमध्ये अजित पवार गटाची बैठक पार पडली. त्यावेळी मंत्री भुजब‌ळांनी उपस्थितांना संबोधित केले.

भुजबळ म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सर्वात कमी जागा आल्या होत्या. लोकसभेच्या जागावाटपावेळी २०१९ ला निवडून आलेल्या जागांचा निकष आमच्यासाठी लावण्यात आला. त्यामुळे आता विधानसभेला लोकसभेसारखी जागावाटपाची खटपट होता कामा नये. यासाठी आताच भाजपला त्यांनी ८०- ९० जागा देण्याचा जो शब्द दिला आहे त्याची आठवण करून द्या, अशी मागणी भुजबळ यांनी अजित पवारांकडे केली आहे.

महायुतीमध्ये आलो तेव्हा भाजपने शब्द दिला होता की, विधानसभेला योग्य जागा मिळतील. त्यामुळे आता आपल्याला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळायला हवा. आम्हाला एवढ्या जागा हव्यात हे त्यांना सांगावे लागेल. जर आपल्याला ८०-९० जागा मिळाल्या तर आपले ५०-६० आमदार निवडून येतील. आता ५० आहेत म्हणजे आम्ही ५० जागा घेऊ असे होणार नाही. त्यामुळे भाजपला आताच सांगून टाका की, आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे, अशी मागणी भुजबळ यांनी केली.

देशात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, सातपैकी सहा टप्प्यांतील मतदान पार पडले. यानंतर आता उर्वरित शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभेच्या जागांवरील मतदान पाचव्या टप्प्यात पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष ४ जूनच्या निवडणूक निकालाकडे लागले आहे.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news