हिंगोली : पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीनेही सोडले प्राण | पुढारी

हिंगोली : पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीनेही सोडले प्राण

आखाडा बाळापूर: पुढारी वृत्तसेवा : पोतरा (ता. कळमनुरी) येथे पोटाचा विकार असलेल्या पतीने गुरुवारी (दि.११) शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या पाठोपाठ तिसऱ्या दिवशी पत्नीने पतीच्या विरहात प्राण सोडल्याची घटना घडली. यामुळे पोतरा परिसरामध्ये पती-पत्नीच्या मृत्यूवर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चंपती पुंजाजी जामकर (वय 75) यांना बऱ्याच वर्षापासून पोटाचा आजार होता. हा आजार अनेक औषधोपचार करूनही बरा झाला नाही. पोटाच्या विकाराच्या यातना सहन न झाल्याने चंपती जामकर यांनी स्वतःच्या शेतातील झाडाला दोर बांधून गुरूवारी गळफास घेतला. त्यांचा सावडण्याचा विधी शनिवारी (दि.13) सकाळी होता. सावडून आल्यानंतर काही तासानंतरच पतीच्या विरहात त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई चंपती जामकर (वय 70) यांनी प्राण सोडले.

या घटनेमुळे पोतरा पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चंपत्ती व लक्ष्मीबाई यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button