नितीन गडकरी यांचे सूचक विधान,” देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर …” | पुढारी

नितीन गडकरी यांचे सूचक विधान," देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर ..."

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत; पण प्रदेशाध्यक्ष असलेला माणूस पूढे काय होतो हे आपण बघितलेले आहे. फडणवीस केद्रांत गेले तर बावनकुळे हे मुख्यमंत्री होतील, असे सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. तसेच या बावनकुळे यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या वक्तव्याची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. लहान कार्यकर्त्याला मोठ्या पदावर जाण्याची संधी या पक्षातच मिळते. येथे घराणेशाही नाही, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

वारशाने कोणी तिकीट मागू नये

राजकारण्यांची मुलं असण्यात गुन्हा नाही. पण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर जागा निर्माण करावी.लोकांनी स्वतःहून मागणी केल्यास राजकारण्यांच्या मुलांना तिकीट द्यायला हरकत नाही; पण केवळ वारशाने तिकीट कोणी मागू नये, असं गडकरी यांनी सांगितले. काही कार्यकर्ते झोकून देऊन काम करणारे असतात तर काही नुसतेच बोटाने मलम लावणारे असतात. बावनकुळे निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते आहेत, असेही गडकरी यावेळी म्‍हणाले.

सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता पक्षाच्या सर्वोच्चस्थानी जाऊ शकतो : फडणवीस

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांची नियुक्ती अभिमानाचा विषय असल्याचे सांगितले. भाजपमध्ये अध्यक्षपदही मोठी जबाबदारी असते. यापूर्वीच्या अध्यक्षांनी केलेल्या कामामुळे पक्ष राज्यातील कानाकोपऱ्यात गेला. सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता मेहनतीच्या भरवशावर पक्षाच्या सर्वोच्चस्थानी जाऊ शकतो हे भाजपचे वैशिष्ट्य आहे, असे फडणवीस म्हणाले.
निधी खेचून आणण्यात चंद्रशेखर बावनकुळे हातखंडा आहे. इतर पक्षांच्या आमदारांच्या पत्रावर ते निधी आणायचे. एकदा हाती घेतलेले काम ते पूर्ण करूनच थांबतात, असेही फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नितीन गडकरीमुळे महाराष्ट्राची इज्जत वाचली, असा टोलाहड फडणवीस यांनी लगावला.

हेही वाचा : 

 

 

Back to top button