एका धूमकेतूचा मृत्यू… | पुढारी

एका धूमकेतूचा मृत्यू...

वॉशिंग्टन ः एखाद्या धूमकेतूचा मृत्यू होण्याची घटना आता कॅमेर्‍यात टिपण्यात यश आले आहे. सोलर अँड हेलिओस्फेरिक ऑब्झर्व्हेटरी (सोहो) वरील कोरोनाग्राफ्सने एका धूमकेतूला थेट सूर्याच्या दिशेन जाऊन त्याच्यामध्ये विलीन होण्याची घटना रेकॉर्ड केली आहे.

6 ऑगस्टला या घटनेची सुरुवात झाली होती. रविवारी एक व्हिडीओ जारी करण्यात आला ज्यामध्ये धूमकेतू सूर्याकडे जात असताना व त्यावर क्रॅश होत असताना दिसून येतो. ‘स्पेसवेदर’च्या रिपोर्टनुसार हा धूमकेतू आता पूर्णपणे नष्ट झालेला आहे. खगोलशास्त्रज्ञ टोनी फिलिप्स यांनी म्हटले आहे की हा धूमकेतू कदाचित एक ‘क्रुट्ज सुंग्रेजर’ होता जो अशा धूमकेतू कुळातून येतो जो प्रदक्षिणा घालत असताना सूर्याच्या कक्षेच्या अतिशय जवळ जातो. असे धूमकेतू एका विशालकार धूमकेतूचे तुकडे असतात जे सूर्याची प्रदक्षिणा घालणारा धूमकेतू तुटल्याने निर्माण होतात. कधी कधी यापैकीच एखादा सूर्याच्या अतिशय जवळ जाऊन आपल्या मृत्यूलाच अलिंगन देतो.

अर्थात हे धूमकेतू आदळल्याने कोणताही परिणाम दिसून येत नाही. याचे कारण म्हणजे अशा बहुतांश धूमकेतूंचा आकार काही मीटरपेक्षाही कमी असतो. ‘सोहो’ या सूर्याच्या खोल कोअरच्या बाहेरील कोरोना (आभामंडळ) व सौर वादळांचे अध्ययन करणार्‍या वेधशाळेने या धूमकेतूचा मृत्यूपर्यंतचा हा प्रवास टिपला आहे.

Back to top button