चिंचवडगावातील ड्रेनेजचे पाईप तुटले | पुढारी

चिंचवडगावातील ड्रेनेजचे पाईप तुटले

पिंपरी : चिंचवड भागातील विवेक वसाहत रोडवर अनेक दिवसांपासून तुटलेले ड्रेनेजचे दोन पाईप पडून आहेत. त्यात कचरा व पाणी साचून राहिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. केशवनगर भागात अनेक दिवसांपासून नागरिकांच्या समस्या दूर होत नव्हत्या. याबाबत महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी शहर अभियंता मकरंद निकम व ब प्रभाग क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे यांच्याशी समस्यांबाबत चर्चा करून निवेदन दिले.

तालेरा रोडवर खोदकाम झाल्यानंतर राडारोडा एक महिना झाला तसाच पडून आहे. शनी मंदिर समोर व बीएसएनएल ऑफिससमोर पाण्याचा निचरा होत नाही. तसेच, पाऊस उघडला असला तरी या ठिकाणी चिखल होऊन मोठी दुर्गंधी सुटली आहे. प्रसुन साई सोसायटी शिवाजी उदय मंडळाजवळ पाण्याचा निचरा होत नाही. मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत आहे. प्रभागात विविध ठिकाणी पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यामुळे पाणी तुंबणे व त्यामुळे चिखल होत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांनी त्वरित योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. सर्व समस्या त्वरित सोडवल्या जातील, असे आश्वासन मकरंद निकम व अभिजित हराळे यांनी आश्वासन दिले आहे.

Back to top button