दिल्लीत राजकीय हालचालींना वेग : बंडखोर खासदारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट | पुढारी

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग : बंडखोर खासदारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा:  शिवसेना आमदारांपाठोपाठ खासदारांनीदेखील बंड पुकारल्याने विधिमंडळासह संसदेत देखील शिवसेना गटात उभी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बंडाच्या तयारीत असलेल्या १२ खासदारांनी मंगळवारी (दि.१९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. बैठकीत स्वतंत्र गट स्थापन करण्यासंबंधी महत्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या बैठकीत खासदार धैर्यशील माने, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे, डॉ. श्रीकांत शिंदे, भावना गवळी, प्रतापराव जाधव, संजय मंडलिक, सदाशिव लोखंडे, राजेंद्र गावित उपस्थित होते. पंरतु, अद्यापही स्वतंत्र गटासाठी आवश्यक संख्याबळ जुळत नसल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेच्या बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची देखील भेट घेत त्यांच्या सोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी स्वतंत्र गटासंबंधी त्यांना पत्र दिल्याचे कळतेय. परंतु, या पत्रात लोकसभा सचिवालयाने काही बदल सुचवले आहेत. मुख्य प्रतोदच्या नावाने पत्र द्यावे, अशी सूचना सचिवालयाने केली आहे.

राहुल शेवाळे यांना गटनेता नेमण्याच्या हालचालींना वेग

लोकसभेचे गटनेते विनायक राऊत शिंदे गटासोबत नाहीत. त्यामुळे शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांना गटनेता नेमण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शिंदे गटाने भावना गवळी मुख्य प्रतोद असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भावना गवळी यांच्या नावाने पत्र आणि १२ खासदारांच्या सह्या अशी रचना करून पत्र नव्याने देण्याची सूचना लोकसभा सचिवालयाने केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नवीन महाराष्ट्र सदनात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार धनंजय महाडिक, उदयनराजे भोसले, जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, सुभाष भामरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत चर्चा केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button