नांदेड : पुरातून थर्माकोलच्या हुडीवरून नवरदेव पोहोचला लग्नमंडपात | पुढारी

नांदेड : पुरातून थर्माकोलच्या हुडीवरून नवरदेव पोहोचला लग्नमंडपात

उमरखेडः प्रशांत भागवतः उमरखेड परिसरात गेल्या पाच दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. परिणामी अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटलेला आहे. यवतमाळ – नांदेड जिल्ह्याला विभागणारी पैनगंगानदी ही दुथडी भरून वाहत आहे. अशातच हदगाव तालुक्यातील करोडी येथील एका तरुणाचे नियोजित लग्न शुक्रवारी (दि.१५) उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली येथे होते. तत्पुर्वी आदल्या रात्री टीळा, हळदीच्या कार्यक्रमासाठी नवरदेव चक्क थर्माकोलच्या हुडीवर बसून सासुरवाडीत पोहोचला. याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

करोडी (ता. हदगाव) येथील शहाजी माधव राकडे मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतो. त्याचा विवाह नात्यातीलच संगम चिंचोली (ता. उमरखेड) येथील वधू गायत्री बालाजी गोंडाडे या मुलीशी एक महिन्यापूर्वी जुळून आला होता. ठरल्याप्रमाणे गुरूवारी (दि.१४) सकाळी वधुकडे टीळा कुंकु पानवाट्याचा व रात्री हळदीचा कार्यक्रम होता. सततच्या पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती असताना संगम चिंचोली हे पैनगंगानदी व कयाधु नदीच्या संगमावर गाव आहे. त्यामुळे येथील पूर परिस्थिती बिकट झाली होती. त्यामुळे टीळा, कुंकू पानवाट्याच्या कार्यक्रमाला पोहोचायचे कसे ? असा प्रश्न लग्न घरी सर्वांना पडला. त्यानंतर शहाजी राकडे आपल्या नातेवाईकांसह थर्माकोलच्या हुड्या वरून पैनगंगा नदीतून ७ किमी पुरातून अंतर कापत सासरवाडी संगम चिंचोली येथे पोहोचले. सुमारे दोन तास प्रवास करून सुखरूप १२ वाजता पोहोचल्याने सर्वांनी सुटकेचे निश्वास टाकला.

दरम्यान, वराच्या टिळ्याचा, वधुचा कुंकू पानवाट्याचा कार्यक्रम संपन्न झाला. रात्री हळदीचा कार्यक्रम झाला. टीळा, कुंकवाचा कार्यक्रम उरकून सोबतचे काही नातेवाईक गावाकडे परतले.  लग्नाच्या तयारीसाठी कामाला लागले.  पुराच्या पाण्यातून पैनगंगा नदीतून टीळा हळदीच्या कार्यक्रमासाठी नदी मार्गे पोहोचलेला वर परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. दरम्यान, आज (शुक्रवार) सकाळी साडे अकरा वाजता उभयतांचे लग्न मोठ्या थाटामाटात लागले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button