पुढारी ऑनलाईन डेस्क : लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी भलेही काही खास प्रदर्शन केले नाही, पण गोलंदाजीत मात्र त्यांनी अप्रतिम कामगिरी केली. घातक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने टीम इंडियाचा 100 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारताच्या सहा फलंदजांना तंबूचा रस्ता दाखवणा-या रीस टोपलीने (Reece Topley) सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. त्याच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. टोपलीने गोलंदाजीदरम्यान 9.5 षटके फेकली, ज्यातील दोन षटके निर्धाव होती.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रीस टोपलीने 24 धावांत 6 बळी घेतले. त्याने भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडण्याचे काम सुरुवातीपासूनच केले. कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या विकेट्स घेवून इंग्लंडच्या विजयात मोठा वाटा उचलला. टोपलीची ही गोलंदाजी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. (Reece Topley)
रीस टोपली (Reece Topley) यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1994 रोजी इंग्लंडच्या इप्सविच शहरात झाला. सध्या तो 28 वर्षांचा आहे. 2009 मध्ये, वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी टोपली चर्चेत आला. माजी इंग्लिश कर्णधार केविन पीटरसनला एका सरावसत्रात टोपलीला गोलंदाजी करण्यास निवडले. त्यातवेळी टोपलीने फेकलेला उसळता चेंडू पीटरसनच्या कानावर आदळला. ज्यात पीटरसन गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर हा भेदक गोलंदाज प्रसिद्धी झोतात आला. त्यानंतर निवडकर्त्यांनी टोपलीवर लक्ष ठेवले. अखेर त्याच्या खेळातील सातत्य पाहून 2015 मध्ये पहिल्यांदा त्याला इंग्लंडकडून खेळण्याची संधी मिळाली. टोपलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि टी-20 पदार्पण केले. मात्र, त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत. आतापर्यंत टोपलीने इंग्लंडकडून केवळ 17 एकदिवसीय आणि 12 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 28, तर टी-20मध्ये 12 विकेट्स घेतल्या आहेत.
रीस टोपलीने भारताविरुद्ध आपल्या आक्रमक गोलंदाजीने लॉर्ड्सवर इतिहास रचला आहे. त्याने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 24 धावांत 6 फलंदाजांना बाद केले. ही वनडेतील कोणत्याही इंग्लंड गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी आहे.