माजी न्यायमूर्तींविरोधात अवमानना खटला चालवण्यास ‘एजीं’चा नकार | पुढारी

माजी न्यायमूर्तींविरोधात अवमानना खटला चालवण्यास 'एजीं'चा नकार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
सर्वोच्च न्यायालयाची अवमानना केल्याप्रकरणी माजी न्यायमूर्तींसह इतर दोघांवर खटला चालवण्याची परवानगी देण्यास अटर्नी जनरल (एजी) के.के.वेणुगोपाल यांनी नकार दिला आहे. मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या मतावर दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस.एन.धिंगरा, माजी एएसजी अमन लेखी तसेच वरिष्ठ वकील राम कुमार यांनी टीकात्मक मत व्यक्त केले होते.पंरतु, ही टीका योग्य तसेच वाजवी मर्यादेत असल्याचे एजी म्हणाले. संबंधितांकडून करण्यात आलेली टीका न्यायपालिकेचा गौरव तसेच न्यायप्रशासनात कुठलाही अडथळा नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘टीका द्वेषाने प्रेरित असल्याचे दिसून येत नाही’

न्यायालयीन कार्यावाहीवर नि:ष्पक्ष तसेच योग्य टीकेला न्यायालयाची अवमानना ग्राह्य धरता येणार नाही, असे विविध निकालातून सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. संबंधितांकडून करण्यात आलेली टीका द्वेषाने प्रेरित, न्यायपालिकेची प्रतिमा मलीन करण्यासाठी हेतुपुरस्सर प्रयत्न असल्याचे दिसून येत नाही, असे एजी म्हणाले.

वरिष्ठ वकील सीआर जयासुकिन यांनी अटर्नी जनरल यांच्याकडे दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती धिंगरा, माजी एएसजी अमन लेखी तसेच वरिष्ठ वकील राम कुमार यांच्याविरोधात अवमानना कार्यवाही सुरू करण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयीन अवमानना प्रकरणात कलम १५ अन्वे सर्वोच्च न्यायालयात कुठल्या खासगी व्यक्तीकडून दाखल करण्यात आलेल्या अवमानना याचिकेवरील सुनावणीपूर्वी अटर्नी जनरल यांची सहमती आवश्यक असते.

Back to top button