पालघर : मुंबई -वडोदरा हायवेचे काम करणारे १३ कामगार वैतरणा नदीच्या पुरात अडकले | पुढारी

पालघर : मुंबई -वडोदरा हायवेचे काम करणारे १३ कामगार वैतरणा नदीच्या पुरात अडकले

पालघर, पुढारी वृत्‍तसेवा : वैतरणा नदीपात्रात दहिसर – बहाडोली गावादरम्यान मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गासाठी सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाचे काम करणारे बारा कामगार बुधवरी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नदीच्या प्रवाहात अडकल्याने खळबळ उडाली. नदीपात्राच्या मध्यभागी तैनात केलेल्या बार्जवर कामगार काम करीत होते. नांगर तुटल्याने हेलकावे खाणाऱ्या बार्जवर अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे प्रमुख जिल्हाधिकारी, महसूल आणि पोलीस विभागाचे वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. एन डी आर एफ च्या पथकाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, कामगारांना बाहेर काढण्यासाठी कोस्टगार्डच्या मदतीने एअर लिफ्ट करण्याचे प्रयत्न जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून सुरू आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून पालघर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैतरणा नदीच्या प्रवाहाने रौद्ररूप धारण केले आहे. वैतरणा नदीच्या उपनद्यावरील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वैतरणा नदी पात्राच्या पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत आहे. मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गासाठी दहिसर आणि बहाडोली गावादरम्यान वैतरणा नदीपात्रात पुलाचे बांधकाम सुरू आहे. वैतरणा नदीपात्रात सुरू असलेल्या कामासाठी जीआर इन्फ्रा कंपनीच्या वतीने बार्ज तैनात करण्यात आला आहे. नदी पात्राच्या मध्यभागी पिलर उभा करण्यासाठी बार्जवर कामगार तैनात करण्यात आले आहेत.

बुधवारी दुपारी वैतरणा नदी पात्राच्या पाण्यात अचानक वाढ झाल्याने नदीपात्राच्या मध्यभागी असलेल्या बार्जचा नांगर तुटल्याने बार्ज नदीपात्रात हेलकावे खाऊ लागला होता. त्यामुळे बार्जवर अडकलेल्या बारा कामगारांनी मदतीसाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला होता. कंपनीने बार्जवर अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षासोबत संपर्क साधला होता. आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्काळ एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले होते. सायंकाळी साडे सहा वाजल्यापासून एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य सुरू होते.

नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे एनडीआरएफच्या पथकाला बचाव कार्यात अडथळे निर्माण होत असल्याने कामगारांची सुटका करण्यात अपयश आले होते. त्यामुळे रात्री अकरा वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. एनडीआरएफच्या पथकाला बचावकार्यात अपयश येत असल्याच्या पार्श्वभूमीवर बार्जवर अडकलेल्या कामगारांना एअर लिफ्ट करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी कोस्टगार्डकडे दिला होता. परंतु मुसळधार पाऊस आणि खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर कोस्ट गार्डने रात्रीच्या वेळी बचावकार्य करण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. काहीही करून वैतरणा नदी पात्रात अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकारी मंत्रालय स्तरावरून मदत उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा

Back to top button