मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले | पुढारी

मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले

कुर्ला; पुढारी वृत्तसेवा : मुंबई उपनगराला बुधवारी (दि. १३ जुलै) पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पहाटे सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दुपारी थोडी उसंत घेतली. परंतु, संध्याकाळी पुन्हा पावसाची जोरदार उघड झाप सुरू होती. यामुळे चाकर मान्यांची कामावर जाताना आणि परत घरी येताना मोठी तारांबळ झाली. सकाळी झालेल्या पावसाने चेंबूरच्या शेल कॉलनी परिसरात पाणी भरले होते. शेल कॉलनी वरून सावंत बाजारकडे जाणाऱ्या रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. यामुळे बाजाराकडे जाणाऱ्या आणि चेंबूर स्थानकाकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या पावसामुळे काही पडझडीच्या घटना ही उपनगरात घडल्या.

पवईमध्ये इंदिरा नगर आणि हरी ओम नगर या ठिकाणी संरक्षक भिंत आणि घराच्या भिंती कोसळून तीन ते चार घरांचे नुकसान झाले आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र धोकादायक असलेल्या आजू बाजूच्या घरांना पालिकेने रिकामे केले असून सुरक्षित ठिकाणी त्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सकाळ पासूनच पूर्व उपनगरात मुलुंड, भांडुप, विक्रोळी, पवई, घाटकोपर, चेंबूर या सर्वच ठिकाणी पावसाची रिपरिप रात्री पर्यंत सुरू होती. याचा परिणाम पूर्व द्रुतगती मार्गावर देखील झाला होता. कुर्ला ते सायन पर्यंत पावसामुळे वाहतूक कोंडी देखील लागली होती. एकूणच दिवस भर सुरू असलेल्या पावसाने जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते.

Back to top button