पावसामुळे सेवा रस्त्यावर वाहतूककोंडी | पुढारी

पावसामुळे सेवा रस्त्यावर वाहतूककोंडी

ताथवडे : पुढारी वृत्तसेवा : मागील पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील पुणे-मुंबई महामार्गावरील ताथवडे येथील गाडा रस्त्याकडे जाणार्‍या सेवा रस्त्यावर मंगळवारी वाहतूककोंडी झाली होती. गेल्या आठवड्यापासून सगळीकडे पावसाने चांगलाच जोर धरला असून, याचा सर्वात जास्त फटका वाहनचालकांना बसत आहे.

पुणे-मुंबई महामार्ग असल्याने या मार्गावरून प्रवास करणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. तसेच, परिसरात असलेल्या नामांकित शाळा, उच्चभ्रू सोसायट्या, मॉल यामुळे या परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे या रस्त्यावरून वाहनांची नेहमी वर्दळ असते. ताथवडेतील सेवा रस्त्यावरून भूमकर चौककडे, काळाखडक येथून येणारी वाहने आणि गाडा रस्त्याकडे जाणारी वाहने एकाच दिशेने जातात. त्यामुळे वाहनाची संख्या जास्त आणि रस्ता अरुंद अशी परिस्थिती उद्भवते.

पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच, सखल भागात पाणी साचल्याने वाहनांचा वेग मंदावून वाहतूककोंडीत भर पडत आहे.
याचबरोबर नो पार्किंग झोनमध्ये लावलेली वाहने आणि बेशिस्त वाहनचालक यामुळे या रस्त्यावर वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. त्यामुळे येथून प्रवास करताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. सध्या शाळा सुरू आहेत.

मुलांना शाळेत सोडताना पालकांना तसेच शालेय बस, वाहनांना वाहतूककोंडीमुळे वेळेवर पोहोचणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Back to top button