बाहुबली समोसा : आठ किलोंचा समोसा खा; 51 हजार मिळवा! | पुढारी

बाहुबली समोसा : आठ किलोंचा समोसा खा; 51 हजार मिळवा!

मेरठ : हल्‍ली देशातील अनेक धाबे, रेस्टॉरंटस्नी भले मोठे खाद्यपदार्थ तयार करून ते खाण्याचे आव्हान देत आपली जाहिरात करून घेण्याचा अनोखा फंडा अवलंबलेला आहे. सर्वात मोठा पराठा, सर्वात मोठी थाळी असे काही प्रकार आपल्याला माहिती असतील. आता उत्तर प्रदेशातील मेरठमधील असाच एक ‘बाहुबली समोसा’ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. तब्बल 8 किलो वजनाचा हा समोसा कुणी अर्ध्या तासात फस्त करून दाखवला तर त्याला 51 हजार रुपयांचे बक्षीस ठेवलेले आहे!

गेल्या काही दिवसांमध्ये काही लोकांनी हे आव्हान स्वीकारून हा बाहुबली समोसा अर्ध्या तासात खाण्याचा प्रयत्न करून पाहिला. मात्र, कितीही खादाड असला तरी माणूस म्हणजे बकासूर नाही. त्यामुळे अर्थातच हा प्रयत्न अयशस्वी ठरला. खरे तर 8 किलो वजनाचा हा समोसा अर्ध्या तासात संपवण्यासाठी एक नव्हे तर 70-80 लोकही लागले!

मेरठच्या लाल कुर्ती बाजारातील कौशल स्वीटस् नावाच्या दुकानात हा समोसा आहे. विक्रेते शुभम कौशल यांनी काही तरी वेगळे करण्याचे ठरवले होते. त्यामधूनच त्यांना असा समोसा बनवण्याची कल्पना सुचली. सुरुवातीला त्यांनी चार किलोचा समोसा बनवला होता. त्यावेळी हा समोसा खाण्यासाठी 11 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

त्यानंतर त्यांनी 51 हजार रुपयांचे बक्षीस असलेलं 8 किलो समोसा खाण्याचं नवं चॅलेंज दिलं आहे. हा समोसा तयार करण्यासाठी एक ते दीड तास लागतो. त्यामध्ये बटाट्याची भाजी, मटार, पनीर आणि सुकामेवा असतो. हा समोसा तयार करण्यासाठी 1100 रुपयांचा खर्च येतो. आता लवकरच ते दहा किलोंचाही समोसा बनवणार आहेत.

Back to top button