गोवा : काँग्रेस आमदारांना पक्ष सोडण्यासाठी 40 ते 50 कोटींची ऑफर : गिरीश चोडणकर यांचा आरोप | पुढारी

गोवा : काँग्रेस आमदारांना पक्ष सोडण्यासाठी 40 ते 50 कोटींची ऑफर : गिरीश चोडणकर यांचा आरोप

पणजी : पुढारी वृत्तसेवा : गोव्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गोव्यातील काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोवा काँग्रेस राजकीय समुद्रात बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोव्यातील काँग्रेस आमदारांना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी 40 ते 50 कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी रविवारी सांगितले.

चोडणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसच्या आमदारांवर पक्ष सोडण्यासाठी भाजप सरकारकडून प्रचंड दबाव निर्माण केला जात आहे. भाजप सरकारचे मित्र असणाऱ्या खान मालकांचा ही प्रचंड दबाव आमदारांवर आहे. कॉंग्रेस पक्ष सोडण्यासाठी एका आमदाराला 40 ते 50 कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा आराेप त्‍यांनी केला.

मतदानापूर्वी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी, उमेदवारांनी काँग्रेस पक्ष सोडणार नाही अशी शपथ घेतली होती. ही शपथ मंदिर, चर्च आणि मशीद येथे घेण्यात आली होती. माध्यमांशी बोलताना या घटनेचा उल्लेख चोडणकर यांनी केला. ते म्हणाले प्रार्थना स्थळांमध्ये शपथ घेऊनही आमदार पक्ष कसा काय सोडू शकतात?, असा सवालही चोडणकर यांनी केला.

दरम्यान, गोवा विधानसभेची सदस्य संख्या ४० इतकी आहे. बहुमतासाठी २१ हा जादुई आकडा लागतो. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष म्हणजेच मगोप सरकारमध्ये सामील आहे. सध्या सरकारला कोणताही धोका नाही. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी अलीकडेच एक विधान केले होते. ते म्हणाले होते २०२७ मध्ये भाजपकडे ३० आमदार असतील. यानंतर काही दिवसातच भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी गोव्यात आले होते. त्यांनी सांगितले की, २०२७ नव्हे तर २०२२ मध्येच भाजपकडे ३० आमदार असतील. त्यांनी भाजपमध्ये अनेकजण येण्यास इच्छुक असल्याचे संकेत दिले होते. सध्याच्या घडामोडी पाहता तसे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्याचे पक्षीय बलाबल असे –

भाजप २०
काँग्रेस ११
आम आदमी पक्ष २
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष २
रिवूलशनरी गोवन्स १
गोवा फॉरवर्ड १
अपक्ष -३

हेही वाचा

Back to top button