एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट, मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी झाली चर्चा | पुढारी

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट, मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी झाली चर्चा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (शुक्रवार) रात्री १० वाजण्याच्या सुमारास केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे शुक्रवारपासून शनिवार दुपारपर्यंत दिल्ली दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी संध्याकाळी दोन्ही नेत्यांचे दिल्ली येथे आगमन झाले. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची त्यांच्या कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी भेट घेतली. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी बैठकीदरम्यान चर्चा झाल्याचे कळतेय. भाजप आणि शिंदे गटाला मंत्रिमंडळात किती प्रतिनिधित्व द्यायचे तसेच खाते वाटपासंबंधी बैठकी दरम्यान बोलणी झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. ते आम्ही महाराष्ट्रामध्ये सिद्ध केले आहे. विधानसभा अध्यक्षांनी तशी आम्हाला मान्यता दिली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पोहचल्यावर दिली. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान,गृहमंत्री तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासोबत भेट घेणार असून या नेत्यांसोबत झालेल्या भेटीनंतर सविस्तर माहिती देवू,असे शिंदे यावेळी म्हणाले.

आता तर फक्त सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रासाठी आणखी खूप काम करायचे आहे. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. शेतकऱ्यांसाठी कामे करायची आहेत, असे ते म्हणाले. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कुणाचे? असा सवाल विचारला असता त्यांनी न्यायव्यवस्थेवर पुर्ण विश्वास आहे. कायद्याने जे करायला पाहिजे होते, घटनेमध्ये ज्या तरतूदी आहेत, त्यानूसार आम्ही निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच ते दिल्ली दौऱ्यावर आहेत. सायंकाळी त्यांचे नवीन महाराष्ट्र सदनात आगमन झाले यावेळी निवासी आयुक्त डॉ.निरुपमा डांगे यांनी त्यांचे स्वागत केले.

हे ही वाचा : 

Back to top button