खाद्यतेल विक्रीचा काळाबाजार! १ लिटर पाकिटात ९०० ग्रॅम पेक्षा कमी तेल, तेल कंपन्या केंद्राच्या रडारवर | पुढारी

खाद्यतेल विक्रीचा काळाबाजार! १ लिटर पाकिटात ९०० ग्रॅम पेक्षा कमी तेल, तेल कंपन्या केंद्राच्या रडारवर

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : केंद्र सरकारने बुधवारी खाद्यतेल उत्पादन आणि विपणन कंपन्यांना तातडीने आयात केलेल्या खाद्यतेलांच्या कमाल किरकोळ किमती (maximum retail price) कमी करण्याची सूचना केली आहे. पामतेल, सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे दर प्रति लिटर १०-१२ रुपयांपर्यंत कमी करावेत, असे निर्देश केंद्राने दिले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाची उपलब्धता वाढली असल्याने किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनी एका आठवड्याच्या आत दर कमी करावेत, असेही केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

भारतातील खाद्यतेलाच्या मागणीपैकी ६० टक्के मागणी आयातीतून पूर्ण केली जाते. यामुळे आंतरराष्ट्रीय किमतीतील चढ-उताराचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारातील दरावर होतो. दरम्यान, सर्व प्रमुख खाद्यतेल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी येत्या एका आठवड्यात किमती कमी करण्यास आणि केंद्राच्या सल्ल्याचे पालन करण्याचे मान्य केले असल्याची माहिती केंद्रीय अन्न मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
खाद्यतेलाचे दर कमी झाल्यास ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या एका महिन्यात शेंगदाणे आणि वनस्पती तेल वगळता सर्व प्रमुख खाद्यतेलाच्या किमतीत किरकोळ घट झाली आहे. खाद्यतेलाच्या किमती करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. सरकारने गेल्या काही महिन्यांत केलेल्या उपाययोजनांमुळेही किमती घसरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या किमती घसरल्या असताना कंपन्यांना पूर्वीच्या दराने विक्री सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे केंद्राचे म्हणणे आहे.

खाद्यतेलाच्या किमतीबाबत नुकतीच केंद्रीय अन्न खात्याचे सचिव सुधांशू पांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारकडून गेल्या एका आठवड्यात खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती कशा घसरल्या आहेत याचा उल्लेख करण्यात आला. तसेच देशभरातील एकाच ब्रँडच्या तेलासाठी एमआरपी एकसमान करण्यास सांगण्यात आले आहे. सध्या देशातील विविध भागात एकाच ब्रँडच्या तेलाच्या एमआरपीमध्ये सुमारे ३-५ रुपये प्रतिलिटर फरक दिसून येत आहे.

खाद्यतेलाचा विक्री व्यवहार पारदर्शक नसून ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींचा मुद्दाही अन्न मंत्रालयाने उपस्थित केला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना पांडे यांना सांगितले की, काही कंपन्यांमध्ये खाद्यतेल १५ अंश सेल्सिअस तापमानात पॅक केले जाते. पण त्यांनी ३० अंश सेल्सिअस तापमानात तेल पॅक केले पाहिजे. १५ अंश सेल्सिअस तापमानात पॅकिंग केल्याने तेलाचे वजन कमी होते. पण कमी झालेल्या वजनाचा पॅकेजवर उल्लेख केला जात नाही. ही व्यापाराची चुकीची पद्धत आहे. याचा फटका ग्राहकांना बसतो. उदा. खाद्यतेल कंपन्या तेलाच्या पाकिटावर ९१० ग्रॅम खाद्यतेल १५ अंश सेल्सिअसवर पॅक केले जाते, असे छापतात. पण प्रत्यक्षात त्याचे वजन ९०० ग्रॅम पेक्षा कमी असते, असे त्यांनी नमूद केले आहे.

 हे ही वाचा :

नाशिक : तब्बल पावणे पाच लाखांच्या खाद्यतेलावर डल्ला, किराणा दुकान फोडले

सर्वसामान्यांना दिलासा : खाद्यतेलाच्या किंमती होणार स्वस्त; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Back to top button