नाशिक : तब्बल पावणे पाच लाखांच्या खाद्यतेलावर डल्ला, किराणा दुकान फोडले | पुढारी

नाशिक : तब्बल पावणे पाच लाखांच्या खाद्यतेलावर डल्ला, किराणा दुकान फोडले

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डमधील जे.एम. ट्रेडर्स या होलसेल किराणा दुकानाच्या शटरचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ४ लाख ७६ हजार ५८० रुपयांच्या गोडेतेलावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्केटच्या प्रवेशद्वाराजवळ जितेंद्र मांगीलाल भंडारी (रा. अशोक स्तंभ) यांचे जे.एम. ट्रेडर्स हे होलसेल किराणा दुकान आहे. मंगळवार (दि.१०) ते बुधवार (दि.११) दरम्यान अज्ञात चोरट्याने या दुकानाच्या शटरचा कडी कोयंडा तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातून सोयाबिन गोडतेलाचे प्रत्येकी 15 लिटर वजनाचे २५ डबे, सनफ्लॉवर गोडतेलाचे 15 लिटर वजनाचे १३ डबे, सनफ्लॉवर गोडतेलाचे ५ लिटर वजनाच्या 20 कॅन, सोयाबिन गोडेतेलाचे 05 लिटर वजनाच्या 2 कॅन,  सोयाबिन गोडेतेलाचे प्रत्येकी 01 लिटर वजनाचे 400 पैकेट, 30 किलो वजनाच्या साबुदान्याच्या १० गोण्या आणि 10 हजार रूपये रोख रक्कम असा एकूण ४ लाख ७६ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला.
याप्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक पतकी, पोलीस निरीक्षक नलवड़े, सहायक पोलिस निरीक्षक खैरनार, केदार यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना केल्या आहेत. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक डी. पी. खैरनार पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button