पिंपरी : ’त्या’ 47 जणांचा वाढला हुद्दा; पण अधिकारांचे काय..! शासनाने फसवणूक केल्याच्या कर्मचार्‍यांच्या भावना | पुढारी

पिंपरी : ’त्या’ 47 जणांचा वाढला हुद्दा; पण अधिकारांचे काय..! शासनाने फसवणूक केल्याच्या कर्मचार्‍यांच्या भावना

संतोष शिंदे
पिंपरी : अनुभवी कर्मचार्‍यांना पोलिस अधिकारी होण्याची संधी मिळावी. तसेच, पोलिस दलातून किमान अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता यावे, यासाठी गृह विभागाकडून आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 47 पोलिस कर्मचार्‍यांना उपनिरीक्षक (ग्रेड) पदावर पदोन्नती देण्यात आली. त्याच्या खांद्यावर आणखी एक स्टार वाढवण्यात आले. मात्र, पदोन्नतीनंतर अधिकारी पदावर जाऊनही अधिकार शून्य असल्याने संबंधितांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
पोलिस अंमलदार यांना पदोन्नती साखळीमध्ये सामान्यतः पोलिस शिपाई, पोलिस नाईक, पोलिस हवालदार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशा तीन पदोन्नतीच्या संधी मिळतात. एका पदावर दहा वर्षे सेवा कालावधीनंतर पदोन्नती मिळणे अपेक्षित असते.

मात्र सद्यस्थितीत वरच्या श्रेणीतील पदसंख्यामुळे पदोन्नती मिळण्यास उशीर लागतो. तसेच, पोलिस अंमलदारांना सातव्या वेतन आयोगाच्या आश्वासित प्रगती योजनेनुसार दहा, वीस, तीस वर्षाच्या सेवेनंतर योजनेच्या अटी आणि शर्ती पूर्ततेनंतर टप्पा आणि वरच्या पदाची वेतन श्रेणी मंजुरी देण्यात येते. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 47 पोलिस कर्मचार्‍यांना उपनिरीक्षक (ग्रेड) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र, पदोन्नती होऊनही दैंनदिन कामकाजात काही बदल झाला नसल्याने अनेकांनी नाव न छापण्याच्या अटीवर खंत व्यक्त केली आहे.

माझ्या निवृत्तीसाठी काही महिने शिल्लक राहिले आहेत. पोलिस दलातील कामकाजाच्या तब्बल तीस वर्षांचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. दरम्यान, शासनाने आम्हाला अधिकारी पदावर निवृत्त होण्यासाठी दिलेली संधी स्वागतार्ह आहे. मात्र, त्यासाठी ‘ग्रेड पीएसआय’ हे नवीन पद तयार करण्याची गरज नव्हती. आम्हाला उपनिरीक्षक पदावर बढती देऊन अधिकार मिळणे अपेक्षित होते.
– ग्रेड पीएसआय, पिंपरी- चिंचवड

शासन निर्णयानुसार पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 47 जणांना ‘ग्रेड पीएसआय’ म्हणून बढती देण्यात आली आहे. मात्र, संबंधित ‘ग्रेड पीएसआय’ यांना नियमित पीएसआयपदी पदोन्नती मिळेपर्यंत ते सहायक उपनिरीक्षकांची कर्तव्य व जबाबदार्‍या पार पाडणार आहेत.
– सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड.

असा आहे ‘ग्रेड’ पीएसआयचा गणवेश

पीएसआयच्या गणवेशावर दोन स्टार आणि निळी व लाल रंगाची फीत (रिबन) असते. मात्र, ‘ग्रेड’ पीएसआयच्या गणवेशावर दोन स्टार आणि केवळ लाल रंगाची फीत लावण्याचे आदेश आहेत. त्यामुळे आश्वासित प्रगती योजने अंतर्गत पदोन्नती देण्यात आलेले ‘ग्रेड’ पीएसआय ओळखणे सहज शक्य होणार आहे.

या निकषांवर दिली पदोन्नती

सहायक पोलिस उपनिरीक्षक यांना श्रेणी (ग्रेड) पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी गृह विभागाकडून दोन महत्वाचे निकष लावण्यात आले आहेत. पोलिस दलामध्ये तीस वर्ष सेवा पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, सहायक पोलिस उपनिरीक्षक पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव यांचा यामध्ये समावेश आहे.

Back to top button