‘मांगीतुंगी येथे महामस्तकाभिषेक सोहळ्यात स्त्री-पुरुष समानतेचे दर्शन | पुढारी

'मांगीतुंगी येथे महामस्तकाभिषेक सोहळ्यात स्त्री-पुरुष समानतेचे दर्शन

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
श्रीक्षेत्र मांगीतुंगी येथे शुक्रवारी (दि.24) स्त्रीशक्तीचे दर्शन घडले. पहाटे पुणे, औरंगाबाद येथून अनेक भाविक महिला ऋषभदेवपूरम येथे दाखल झाल्या. त्यांनी श्रद्धापूर्वक अभिषेक व पूजनाचा आनंद लुटला. भगवान ऋषभदेवांच्या 108 फुटी उंच अखंड पाषाण मूर्तीवर पंचामृताचा महामस्तकाभिषेक झाला. पंचामृत कलशाचा मान मुंबईचे कमलकुमार कासलीवाल, शालिनीदेवी व अकलूजचे डॉ. संतोष दोषी व त्यांच्या परिवारातील सदस्यांना देण्यात आला. हस्तिनापूरचे प्रधान आचार्य विजय जैन, सांगलीचे दीपक पंडित व सत्येंद्र जैन यांनी पौरोहित्य केले.

स्वामी रवींद्रकीर्ती महाराजांनी शुभाशीर्वाद दिले. व्यासपीठावर महामंत्री संजय पापडीवाल, अधिष्ठाता सी. आर. पाटील, खजिनदार प्रमोद कासलीवाल, अशोक दोशी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. जीवनप्रकाश जैन यांनी प्रास्ताविक केले. हस्तिनापूर येथून ऑनलाइन सहभागी झालेल्या परमपूज्य आर्यिकारत्न डॉ. चंदनामती माताजी व गणिनिप्रमुख ज्ञानमती माताजी म्हणाल्या, स्त्री-पुरुष समानतेचा वस्तुपाठ आज अभिषेकाप्रसंगी सर्वांना बघायला मिळाला. महिला सक्षमीकरण, सबलीकरण आवश्यक असून अनेक जैन युवती विविध क्षेत्रांत अग्रेसर आहेत. तसेच मांगीतुंगी येथे येत्या 30 तारखेपर्यंत भाविकांनी सहकुटुंब येऊन अभिषेक, पूजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सजविलेल्या पंचामृत कलशांमध्ये शेकडो लिटर नारळपाणी, उसाचा रस, तूप, दूध, दही तसेच हरिद्रा, लालचंदन, श्वेत चंदन, चतुष्कोण कलश, केशर, सुगंधी फुले यांचा समावेश करण्यात आला. दुपारच्या सत्रात भगवान पार्श्वनाथ महामंडल विधान – पूजनाने वातावरण दुमदुमून गेले. संध्याकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. सायंकाळी परगावाहून येणार्‍या भाविकांची रीघ लागली होती. शनिवारी व रविवारी गर्दीचा उच्चांक होईल, असा अंदाज महामंत्री संजय पापडीवाल यांनी व्यक्त केला आहे.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था !
दररोज सुमारे हजार भाविक ऋषभदेवपूरम येथे दाखल होत आहेत. त्यांची विनामूल्य निवासाची व भोजनाची व्यवस्था महोत्सव समितीतर्फे करण्यात आली आहे. सोहळ्यात काटेकोर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 20 कर्मचारी तैनात असून, 12 तासांत 10-10 कर्मचारी भाविकांची सुरक्षितता सांभाळतात. 4 कर्मचारी वृषभगिरी येथे चोख सुरक्षा ठेवतात. याशिवाय पोलिसदल, होमगार्ड व वाहतूक पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे.

हेही वाचा :

Back to top button