शिवसैनिक आक्रमक; पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड | पुढारी

शिवसैनिक आक्रमक; पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड

पुढारी ऑनलाईन: शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापले आहे. शिवसेना पक्षाच्या जवळपास ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांना आपले समर्थन दिले आहे. यामुळे एकनाथ शिंदें विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा सामना पहायला मिळत आहे. शिंदे यांच्या बंडामुळे आता शिवसेनेचे कार्यकर्तेही त्यांच्यावर नाराज झाले आहेत. आक्रमक झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड केली आहे. सावंत यांच्या साखर कारखान्याच्या बोर्डालाही त्यांनी काळे फासले. यादरम्यान शिवसैनिकांनी सावंत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पुण्यातील कार्यालयाच्या काचा फोडल्या

पुण्यातील शिवसेनेचे एक माजी नगरसेवक आणि त्यांच्या सात ते आठ सहकाऱ्यांनी मिळून शनिवारी २५ जून रोजी सकाळी कात्रज परिसरातील आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. कात्रज परिसरात असणारे सावंत प्लाझा हे तानाजी सावंत यांच्या मालकीच्या भैरवनाथ शुगर कारखानाचे कार्यालय आहे. शनिवारी सकाळी कर्मचारी नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानक शिवसैनिक हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी करत दाखल झाले. आणि त्यांनी थेट तोडफोड करायला सुरुवात केली. कारखाना कार्यालयाच्या केबीनच्या काचा फोडून खुर्च्या फेकून दिल्या. या तोडफोडी दरम्यान त्यांनी भैरवनाथ शुगर कारखान्याच्या बोर्डास काळे फासले. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस चौकीचे पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Back to top button