लसूण घास लागवड करताय? | पुढारी

लसूण घास लागवड करताय?

दुभत्या जनावरांना दिवसाकाठी 20 ते 25 किलो हिरवा चारा आणि पाच किलो वाळलेला चारा लागतो. या लागणार्‍या चार्‍याची नड भागवण्यासाठी शेतकरी हंगामी चारा पीक घेतो. एका हंगामात घेऊन पुन्हा दुसर्‍या हंगामात दुसरा चारा घेतल्याने शेतकर्‍यावर आर्थिक बोजा वाढतो. यावर उपाय म्हणजे बारमाही हिरवा चारा देणार्‍या लसूण घासाची लागवड करणे. महाराष्ट्रात सध्या शेतीपूरक धंद्यांचा समावेश शेतकर्‍याने करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये दूध उत्पादन, शेळी-मेंढी पालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन इत्यादींचा समावेश आहे. दुग्धोत्पादनापासून मिळणारे उत्पादन शेतकर्‍याला बर्‍याच प्रमाणात सावरताना दिसतेय.

दुग्धोत्पादन हा व्यवसाय पूर्णत: चार्‍यावर अवलंबून आहे. दुभत्या जनावरांना दिवसाकाठी 20 ते 25 किलो हिरवा चारा आणि पाच किलो वाळलेला चारा लागतो. या लागणार्‍या चार्‍याची नड भागवण्यासाठी शेतकरी हंगामी ज्वारी, मका, बाजरी, ओट घेतो. एका हंगामात घेऊन पुन्हा दुसर्‍या हंगामात दुसरा चारा घेतल्याने शेतकर्‍यावर आर्थिक बोजा वाढतो. यावर उपाय म्हणजे बारमाई हिरवा चारा देणार्‍या लसूण घासाची लागवड करणे. लसूण घास हे बारमाई हिरवा चारा देणारे शेंगवर्गीय द्विदल पीक असून ते वातावरणातील नत्र स्थिर करते. पूर्ण एक वर्षाच्या काळात हे पीक जवळपास एक हजार किलो नत्र जमिनीत स्थिर करते. पूर्ण वापरताना ही 150 किलो नत्र जमिनीत स्थिर करून पुढील वर्षी दुसर्‍या पिकास देणारे एकमेव पीक आहे. लसूण घासाच्या चार्‍यात प्रथिने 20 ते 24 टक्के, स्निग्ध पदार्थ 2.3 टक्के, खनिजे 10 टक्के, कर्बोदके 36 टक्के, काष्टमय पदार्थ 30 टक्के, चुना 1.24 चार्‍यात ‘अ’ आणि ‘ड’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात आढळतात.

जमीन : या पिकासाठी मध्यम ते भारी जमीन लागत असून चांगल्या निचर्‍याची आणि 7-8 सामू गरजेचे आहे. हे पीक खारवट जमिनीतही घेता येते. मशागत आणि खत व्यवस्थापन : या पिकासाठी जमीन तयार करताना प्रथम ती नांगरून घ्यावी ढेकळे फोडून कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. त्यानंतर तण किंवा पूर्वीच्या पिकाचे अवशेष गोळा करून ते बांधावर जाळावेत. आता रिजरच्या साहाय्याने वरंब्याच्या वाफे तयार करून घ्यावे. वाफे बांधणी प्रति हेक्टरी 40 गाड्या शेणखत टाकावे. तसेच पेरणीपूर्वी 40 किलो नत्र, 150 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावा. दर चार महिन्यांनी प्रति हेक्टरी 100 किलो नत्र, डीएपीची मात्रा दिल्यावर उत्पादनात भर पडते.
पेरणी आणि जिवाणू खंताचा वापर : लसूण घासाची पेरणी ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात केल्यावर अधिक फायदा होतो. प्रति हेक्टरी 30 किलो बियाणे 30 सेमी अंतराने पेरावे. जिवाणू खते 250 ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यास लावून घ्यावीत, यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.

सुधारित वाण : आनंद -2, आरएल 88
तण आणि पाणी व्यवस्थापन : सुरुवातीच्या आणि नंतरच्या काळात तण जास्त येण्याची शक्यता असते. कारण हे पीक बहुवार्षिक असून जास्त काळ शेतावर असतेे. तणाचे प्रमाण जास्त होऊ नये म्हणून दर दोन महिन्यानंतर पिकांच्या दोन ओळीतील रान कुदळीने खोदून जागा मोकळी करावी. आलेले तण वेचून ते बाहेर फेकून द्यावे. या पिकासाठी पाणी हंगामानुसार द्यावे. खरिपात पावसाचे अंतर पाहून पाणी द्यावे तर उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

पीक संरक्षण : लसूणघास या पिकावर सर्वसाधाण पणे माव्याचा प्रादुर्भाव दिसतो. या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी तीन टक्के निंबोळी ऊर्फ पाण्यात मिसळून फवारावे. दुसरी फवारणी आठ दिवसांच्या अंतराने करावी.

कापणी आणि उत्पादन : पहिली कापणी लागवडीनंतर 55 ते 60 दिवसांनी करावी. नंतरच्या कापण्या 25 ते 30 दिवसांच्या अंतराने कराव्यात. वर्षभरात 10 ते 11 कापण्यांमध्ये जवळपास 100 क्‍विंटल प्रति हेक्टरी हिरवा चारा मिळतो.

– प्रसाद पाटील

Back to top button