समोर येवून सांगा, मी शिवसेना पक्षप्रमुख पदही सोडतो : मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरेंची आमदारांना भावनिक साद | पुढारी

समोर येवून सांगा, मी शिवसेना पक्षप्रमुख पदही सोडतो : मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरेंची आमदारांना भावनिक साद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
मी शिवसैनिकांना बांधील आहे. तुम्‍ही मला समोर येवून सांगा, मी मुख्‍यमंत्रीपद काय, शिवसेना पक्षप्रमुख पदही सोडायला तयार आहे, अशा शब्‍दात आज मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरेंनी आमदारांना भावनिक साद घातली.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्‍या बंड आणि राज्‍यातील बदलेल्‍या राजकीय घडामोडींबाबत मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबूक लाईव्‍हच्‍या माध्‍यमातून राज्‍यातील जनतेशी संवाद साधला. ते म्‍हणाले, मी अनपेक्षितपणे मुख्‍यमंत्री झालो. दोन ते तीन महिन्‍यांमध्‍येच कोरोनाचे संकट आले. प्रशासन माहिती नसलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या वाट्याला हा प्रसंग आला. त्‍या काळात करण्‍यात आलेल्‍या सर्वेक्षणात कोरोना प्रतिबंधासाठी देशात उत्‍कृष्‍ट काम करणार्‍या पाच राज्‍यांमध्‍ये महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश होता. हे केवळ जनतेच्‍या सहकार्यामुळे शक्‍य झाले.

शिवसेना आणि हिंदुत्त्‍व कधीच वेगळे होवू शकत नाहीत

शिवसेना आणि हिंदुत्त्‍व हे जोडलेले शब्‍द आहेत. आम्‍ही कधीच वेगळे होवू शकत नाही. आताची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नाही, असा आरोप केला जात आहे. बाळासाहेबांची शिवसेना आजही कायम आहे. आम्‍ही त्‍यांचा विचार पुढे घेवून जात आहोत. आज आणि उद्‍या आपण हिंदू राहणार आहोत. याच विचारावर २०१४ मध्‍ये  ६३ आमदार निवडणूक आले. त्‍यावेळी मंत्रीमंडळात सहभागी झालेले शिवसैनिकांच होते. मधल्‍या काळात जे मिळाले ते बाळासाहेबांच्‍या शिवसेनेमुळेच मिळाले, अशी आठवणही त्‍यांनी बंडखोर आमदारांना करुन दिली.

आमदारांवर पाळत ठेवावी लागणे हेच दुर्दैवी

विधान परिषद निवडणुकीच्‍या आधी सर्व आमदारांना हॉटेलमध्‍ये ठेवले होते. मीही त्‍यांना भेटायला गेले होता. यावेळी मला वाईट वाटलं. कारण आपल्‍याच माणसांना एकत्र ठेवण्‍यासाठी प्रयत्‍न करावे लागतात  याचं वाईट वाटलं. आमदारांवर पाळत ठेवावी लागणे हेच दुर्दैवी आहे. अशी लोकशाही मला मान्‍य नाही, असेही त्‍यांनी यावेळी नमूद केले.

अविश्‍वास असल्‍यास सांगा, तत्‍काळ राजीनामा देतो

आम्‍हाला उद्‍धव ठाकरे मुख्‍यमंत्री म्‍हणून नकोत, असे काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीच्‍या आमदारांनी म्‍हटलं असतं की, तर मला पटलं असतं. कारण आपण बरेच वर्ष या दोन पक्षांविरोधातच लढत होतो; पण माझ्‍याच लोकांना मी मुख्‍यमंत्री नको असेल तर मी काय करणार? तुम्‍ही समोर येवून हे सांगायला हवे होते. तुम्‍हाला सुरतला जायची काय गरज होती, असा सवालही त्‍यांनी एकनाथ शिंदेसह बंडखोर शिवसेना आमदारांना केला.

मी शिवसैनिकांना बांधील

झाडावर कुर्‍हाडीचे घाव बसतात तेव्हा झाडाला सर्वाधिक वेदना कधी होते तर त्‍याच्‍या झाडाच्‍या लाकडाचा वापर करुन कुर्‍हाडीने झाडावर घाव घातले जातात. शिवसेनेच्‍या तसेच झाले आहे. त्‍यांच्‍याच माणसांना वापरुन शिवसेना संपविण्‍याचे प्रयत्‍न वेदनादायी आहेत. मुख्‍यमंत्री म्‍हणून मी नको आहे. असे शिवसेनेच्‍या एका आमदाराने मला समोर येवून सांगावे. मी तत्‍काळ मुख्‍यमंत्री पदाचा राजीनामा देण्‍यास तयार आहे. मी शिवसैनिकांना बांधील आहे. तुम्‍ही मला सांगा मी शिवसेना पक्षप्रमुख पदही सोडायला तयार आहे, असेही त्‍यांनी सुनावले.

तुमच्‍या कामावर तुमची ओळख ठरते

मी इच्‍छापेक्षा जिद्‍दीने कार्य पार पाडणारा माणूस आहे. शिवसेनाप्रमुखांना दिलेले वचन मी पूर्ण करणारच. काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी या पक्षांविराेधात २५ ते ३० वर्ष आम्‍ही लढलो. यानंतर आम्‍ही एकत्र आलो. शरद पवारांनी मला मुख्‍यमंत्रीपदाची जबाबदारी घेण्‍यास सांगितले. मी घेतली. सोनिया गांधी यांनी सहकार्य केले. मी मुख्‍यमंत्री झालो. मुख्‍यमंत्रीपद मला अनपेक्षितपणे मिळाले. आयुष्‍याची कमाई पद नाही. तर तुम्‍ही काय काम करता, यावर तुमची ओळख ठरते. मुख्‍यमंत्रपदी मला सर्वांचे सहकार्य लाभले . प्रशासनाने मला खूप सहकार्य केले, असे कृतज्ञताही त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.

हेही वाचा : 

Back to top button