उद्धव ठाकरेंचे राजीनाम्यावरून मोठे विधान, ‘माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नकोय’ | पुढारी

उद्धव ठाकरेंचे राजीनाम्यावरून मोठे विधान, ‘माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नकोय’

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेत माजलेला बंडाळी नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंसह गेलेल्या आमदारांवर अप्रत्यक्षरित्या टीका करत माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल, तर या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असे भावनिक विधान त्यांनी यावेळी केले.

विधान परिषद निवडणुकीनंतरच्या घडामोडींमुळे राज्यात उद्भवलेल्या राजकीय पेचामुळे जनतेच्या मनात गेल्या दोन दिवसांपासून संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले होते. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मला पदाचा किंवा सत्तेचा मोह नाही. त्या आमदारांनी त्यांचे मत समोर येत सांगावे, सूरतमध्ये जाऊन त्यांना हे सांगण्याची गरज काय? या संवादानंतर आपण वर्षावरून मातोश्रीवर जाणार आहे. त्यांच्यापैकी एकानेही सांगितले तर मी मुख्यामंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असे स्पष्ट केले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही माझ्यावर विश्वास ठेवला. प्रशासनानेही उत्तम साथ दिली आहे. पण आपल्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेन तर काय करू? असा सवाल सवाल एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर उठवला.

आजपर्यंत सर्वांनी आपल्याला मदत केली आहे. त्यांच्या आग्रहाखातर आपण मुख्यमंत्रीपद स्वीकारले. शरद पवार साहेबांनी आपल्याला मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास सांगितले. शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द आपण पाळत आहोत. एखादी जबाबदारी आली की आपण ती पूर्ण करतो, मी जिद्दीने लढणारा माणूस आहे. आपल्या लोकांवरच लक्ष ठेवावे लागणे, हे योग्य नसते. विधानपरिषदेच्या आदल्या दिवशी राजकीय परिस्थितीबाबत आपण बोललो होतो. ही शिवसेना बाळासाहेबांनंतरची आहे, मात्र विचार बाळासाहेबांचेच आहे. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवल्याचेही ते म्हणाले.
शिवसेना आणि हिंदुत्व कधीही वेगळे होऊ शकत नाही. आपण कोणालाही भेटत नसलो तरी आपले काम सुरू होते. शस्त्रक्रियेनंतर काही महिने आपण कोणालाही भेटू शकत नव्हतो. त्या काळात देशातील सर्वोकृष्ट पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझ्या समावेश झाला होता. कोरोना काळातील लढाईच्या काळात आपण प्रामाणिकपणे काम केले, याचाही उल्लेख यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी केला.

Back to top button