कुरुंदवाड : दिव्यांग चहा विक्रेत्याची मुलगी करणार मेक्सिकोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व | पुढारी

कुरुंदवाड : दिव्यांग चहा विक्रेत्याची मुलगी करणार मेक्सिकोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

कुरुंदवाड; जमीर पठाण : येथील दिव्यांग सुनिल कमलाकर हे वर्षानुवर्षे कुरूंदवाड शहरात फिरून चहा विकतात. त्याची मुलगी निकिता कमलाकर हिची मेक्सिको देशातील लिओन शहरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. निकिताची भारतीय संघात निवड झाल्याने कुरुंदवाडमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. सदर स्पर्धा ९ जून ते १८ जून २०२२ रोजी लिओन येथे होणार आहे. निकिताची ५५ किलो वजनी गटात निवड झाली असून, तिच्या यशासाठी कुरुंदवाडवासिय प्रार्थना करीत आहेत.

निकिताचे वडील एका पायाने दिव्यांग असून, जागेअभावी एका हातात चहाची किटली आणि दुसऱ्या हातात कप घेऊन चहा विक्रीचा व्यवसाय करतात. महापुरात त्यांचे घर पडल्याने ते सध्या गंगापूर-तेरवाड येथे भाड्याच्या घरात राहतात. निकिताची आई धुण्या-भांड्याची कामे करते, तर आज्जी-आजोबा भाजीपाला विक्री करतात. अशा या गरीब कुटुंबातील निकिता भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याने, कुरुंदवाडच्या पारंपरिक क्रीडाक्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला असल्याच्या प्रतिक्रिया क्रीडाक्षेत्रातून व्यक्त होत आहेत.

अपंग वडीलांनी चहा वाटून लेकीच्या यशाचा आनंद साजरा केला

निकीताला वेटलिफ्टिंगमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने सोशल मीडियावर शुभेच्छांचे मेसेज व्हायरल झाले. यावेळी निकिताचे वडील सुनील हे पालिका चौकातील अन्वर मकानदार यांच्या फ्रुटच्या गाड्यावर चहाचे कप भरून देत होते. याचवेळी त्याच्या कानी काही नागरिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चा पडल्या. तिथेच उभे असलेल्या वडिलांनी निकिता माझी मुलगी आहे. काय झालं असं निरागसपणे विचारले असता, नागरिकांनी चौकातील बेकरीतुन पेढे आणून त्यांना भरवले. तुमची मुलगी देशाचं नेतृत्व करणार आहे, असे सांगत त्यांचे आणि त्याच्या मुलीच्या त्याठीकाणी जमलेल्या नागरिकांनी कौतुक केले. हे ऐकल्यानंतर सुनील यांचा आनंद गगनात मावेना. आनंदाश्रू पुसत पुसतच उपस्थितांना त्यांनी चहा वाटत आपल्या लेकीच्या यशाचा आनंद साजरा केला.

संबंधित बातम्या

हेही वाचा :

Back to top button