कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात रविवारपर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. सध्याची स्थिती कायम राहिली, तर रविवार आणि सोमवारी जिल्ह्यात दमदार पावसासह मान्सूनचे आगमन होईल, अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत उकाडा आणि त्यानंतर हवेत निर्माण होणारे पावसाळी वातावरण, यामुळे मान्सूनची चाहूल मिळत आहे.
केरळात वेळेपूर्वी दाखल झालेला मान्सून जिल्ह्यातही वेळेपूर्वी दाखल होईल, अशी शक्यता होती. मात्र, मान्सून नियमित वेळेपेक्षाही लांबला आहे. दरवर्षी साधारणत: 7 ते 8 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होते. यंदा मात्र अद्याप मान्सून आलेला नाही. गेल्या दोन दिवसांत वाढत्या उष्म्याबरोबर हवेत मान्सूनचे ढग दिसू लागले आहेत. यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत मान्सूनच्या सरी बरसतील, असा अंदाज आहे.
हवामान विभागानेही रविवार आणि सोमवारी पावसाच्या जोरदार सरी बरसतील, त्यानंतर मंगळवारी हलका पाऊस होईल. त्यापुढे मात्र पुन्हा शुक्रवार-शनिवारपर्यंत दमदार पाऊस होईल, असा अंदाज आहे. मंगळवारपासून जिल्ह्यात मान्सून बरसत राहील, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी कोल्हापूर शहराचा पारा 34 अंशांपर्यंत गेला होता. दुपारनंतर हवेत ढग तयार झाले. काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या.