सर्दी, खोकला झालाय? | पुढारी | पुढारी

सर्दी, खोकला झालाय? | पुढारी

सध्या वातावरण बदलत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला हे आजार शरीरात ठाण मांडतात; मात्र हवामान बदलाचा त्रास म्हणून त्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. सर्दी, खोकला हे सामान्य आजार असले तरीही त्याचा पुढे गंभीर त्रास होऊ शकतो. मग, लोकांचा कल असतो तो अ‍ॅलोपॅथीकडे. या औषधांनी तात्पुरता आराम मिळतो; पण औषधाचा परिणाम संपला की पुन्हा त्रास सुरू होतो. 

सर्दी, खोकला यामध्ये घरगुती उपाय जास्त कामास येतात. त्याचबरोबर सकाळ-संध्याकाळ कोमट पाण्याने गुळण्या केल्यास फायदा होतो. मुख्य म्हणजे वातावरण बदलत असताना हा त्रास का होतो आणि त्याची लक्षणे आणि उपाय कोणते, त्याची माहिती आपण घेऊ या! 

आजाराचा प्रसार कसा? : बदलत्या मोसमात सर्दी, खोकला यांच्या समस्या निर्माण होतात. कारण, हवेमध्ये विषाणू आणि जीवाणू पसरलेले असतात. त्याचा संसर्ग होतो. शरीराची प्रतिकार क्षमता कमी होते तेव्हा सर्दी, खोकलासारख्या समस्या डोके वर काढतात. धूळ, धूर, प्रदूषण, अ‍ॅलर्जी, थंड-गरम किंवा गरम-थंड अशा विरुद्ध वातावरणात जाणे, ऊन आल्यावर थंड पदार्थ सेवन करणे ही याची प्रमुख कारणे आहेत.

यावर उपाय म्हणजे नाकाच्या आतल्या बाजूला मोहरीचे तेल लावावे. सर्दी, खोकला झालेल्या लोकांच्या संपर्कात येणे किंवा त्यांच्या वस्तू वापरणे टाळावे. आपल्यामुळे इतरांना सर्दी, खोकल्याचा संसर्ग होऊ नये म्हणून शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरावा. उन्हातून आल्या आल्या थंड पाणी पिऊ नये किंवा थंड पदार्थांचे सेवनही करू नये. 

हलका आणि सुपाच्य आहार सेवन करावा. जेवणात पातळ पदार्थांचा समावेश करावा. घरामध्ये कोणा सदस्याला सर्दी, खोकला असेल तर आहारात मसाला वेलची, लवंग, काळी मिरी, दालचिनी, तमालपत्र आणि आले या गरम मसाल्याच्या पदार्थांचा वापर करावा. गरम प्रकृतीच्या पदार्थांचे सेवन करावे आणि कोमट पाणी प्यावे. कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात. त्यामुळे घसा शेकला जाईल आणि खवखव दूर होईल. 

हे करून पाहा : सकाळ-संध्याकाळ गरम पाण्याने गुळण्या केल्यास आराम पडेल.  रात्री झोपताना कोमट दुधामध्ये एक चमचा हळद मिसळून प्यावी. सर्दी, खोकल्यामध्ये त्याचा फायदा होतो. सुंठ, काळी मिरी चांगली बारीक करून त्याची पावडर तयार करावी. त्यात मध मिसळून त्याचे चाटण घ्यावे.  गरम पाणी, गरम सूप इत्यादींचे सेवन करावे. 

Back to top button